अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे गरोदर मातेच्या मृत्यूविरोधात काँग्रेसचे धरणे आंदोलन

149

कावळ ऍम्ब्युलन्स’ची प्रतिकृती दाखवत जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा निषेध

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि. ७ जानेवारी :- दुर्गम व मागास जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत अद्यापही मूलभूत आरोग्य सुविधा व पायाभूत सोयी-सुविधांचा अभाव कायम असल्याने सर्वसामान्य, गोरगरीब व आदिवासी नागरिकांना त्याचा मोठा फटका बसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याचे पालकत्व स्वतःकडे ठेवून सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले असले, तरी प्रत्यक्षात आरोग्य व्यवस्था व रस्ते सुविधांची दयनीय अवस्था कायम असल्याचे वास्तव समोर येत आहे.
नुकत्याच घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेत अपुऱ्या आरोग्य सुविधा व वेळेवर उपचार न मिळाल्याने एका गरोदर मातेचा व तिच्या नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शासन व प्रशासनाच्या गंभीर दुर्लक्षाचे जिवंत उदाहरण असल्याचा आरोप करत या प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
या मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बुधवार, दुपारी १२ वाजता इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे धरणे आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या या आंदोलनात ‘कावळ ऍम्ब्युलन्स’ची प्रतिकृती सादर करत जिल्ह्यातील ढिसाळ आरोग्य व्यवस्थेचा तीव्र निषेध करण्यात आला.
जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था तातडीने सक्षम करावी, अतिदुर्गम भागांना जोडणारे रस्ते तयार करून वाहतूक व्यवस्था सुधारावी, तसेच मृत गरोदर मातेच्या कुटुंबाला न्याय व योग्य आर्थिक मदत द्यावी, अशी ठाम मागणी यावेळी काँग्रेसतर्फे करण्यात आली.
या आंदोलनात जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जि.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, माजी नगराध्यक्ष व ज्येष्ठ नेते रामभाऊ मेश्राम, शहराध्यक्ष व नगरसेवक सतीश विधाते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वासेकर, तालुका अध्यक्ष वसंत राऊत (गडचिरोली), मिलिंद खोब्रागडे (आरमोरी), राजेंद्र बुल्ले (वडसा), प्रशांत कोराम (धानोरा), प्रमोद भगत (चामोर्शी) यांच्यासह नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.