विदर्भातील पत्रकारांच्या हक्कांना नवे बळ ; व्यंकटेश दुडमवार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे विभागीय अध्यक्ष

95

विदर्भातील पत्रकारांच्या हक्कांना नवे बळ ; व्यंकटेश दुडमवार ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे विभागीय अध्यक्ष

लोकवृत्त न्यूज
नागपूर, दि. ११ : पत्रकारांच्या हक्कांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी ज्येष्ठ व निर्भीड पत्रकार व्यंकटेश दुडमवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेच्या मुख्यालयाकडून ७ जानेवारी २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या अधिकृत पत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
संघटनेचे मुख्य संयोजक व राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ तसेच मुख्य संयोजक व संचालक गोरक्षनाथ मदने यांनी स्वाक्षरी केलेल्या नियुक्तीपत्रात दुडमवार यांच्या पत्रकारितेतील उज्ज्वल, धाडसी आणि मूल्याधारित कार्याचा गौरव करण्यात आला आहे. विदर्भातील पत्रकारांच्या समस्या, सुरक्षितता आणि व्यावसायिक हक्कांसाठी संघटनात्मक पातळीवर भक्कम काम करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीपत्रात पत्रकारांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच सत्य, निर्भीड व जबाबदार पत्रकारिता शाश्वत राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विदर्भातील विविध जिल्हे व तालुक्यांमध्ये पदाधिकाऱ्यांची निवड करून सशक्त कार्यकारिणी स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
व्यंकटेश दुडमवार यांनी पत्रकारितेची सुरुवात चंद्रपूर येथून प्रकाशित होणाऱ्या ‘सन्नाटा’ या वृत्तपत्रात अहेरी शहर प्रतिनिधी म्हणून केली. मागील २३ वर्षांपासून त्यांनी प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया तसेच विविध राष्ट्रीय टीव्ही वृत्तवाहिन्यांमध्ये काम केले असून सध्या ते ‘आज तक’ या टीव्ही चॅनेलमध्ये गडचिरोली, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांचे प्रतिनिधित्व करीत आहेत. अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागात जीव धोक्यात घालून केलेले रिपोर्टिंग तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक, आरोग्य व ग्रामीण प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधणारे वृत्तांकन त्यांच्या पत्रकारितेची ओळख ठरली आहे.
दुडमवार यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत ही नियुक्ती करण्यात आल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या नियुक्तीमुळे विदर्भातील पत्रकारांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या जातील आणि संघटनात्मक कार्याला नवी दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या नियुक्तीबद्दल इलेक्ट्रॉनिक विंगचे राज्य प्रवक्ता महेश तिवारी, राज्य कोअर कमिटीचे मंगेश खाटीक, किशोर कारंजेकर, सुमित पाकलवार, संजय तिपाले, गडचिरोली जिल्हा कार्याध्यक्ष नासिर हाशमी, जिल्हा सरचिटणीस विलास ढोरे, जिल्हा कार्यकारिणी, तालुका अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील शेकडो सदस्यांकडून दुडमवार यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
नवीन जबाबदारी स्वीकारताना व्यंकटेश दुडमवार यांनी पत्रकारितेच्या उन्नतीसाठी, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी आणि हक्कांच्या संरक्षणासाठी पूर्णतः समर्पित राहण्याचे आश्वासन दिले आहे.