– अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांना सखोल मार्गदर्शन
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार राज्यभर राबविण्यात येत असलेल्या “नववर्ष प्रण–सुरक्षित अन्न मोहीम २०२५” अंतर्गत गडचिरोली येथे हॉटेल, रेस्टॉरंट व उपहारगृह चालकांसाठी मार्गदर्शनात्मक बैठक पार पडली. हॉटेल असोसिएशन गडचिरोली यांच्या वतीने आयोजित या बैठकीला व्यावसायिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
बैठकीत अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी सुरक्षित, स्वच्छ व भेसळमुक्त अन्नपुरवठ्याबाबत कायदेशीर तरतुदींसह प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
कायदा पाळणे हीच खरी सेवा – सुरेश तोरेम
अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ अंतर्गत हॉटेल व रेस्टॉरंट व्यावसायिकांवर असलेल्या जबाबदाऱ्यांचा सविस्तर ऊहापोह केला. स्वयंपाकगृहातील स्वच्छता, अन्न साठवणुकीच्या योग्य पद्धती, कर्मचाऱ्यांची वैयक्तिक स्वच्छता, स्वच्छ पाण्याचा वापर तसेच प्रमाणित कच्च्या मालाचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले.
ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. सुरक्षित अन्न देणे ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून समाजाप्रतीची महत्त्वाची सामाजिक बांधिलकी आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
तपासणी म्हणजे त्रास नव्हे, तर संरक्षण – जितेंद्र कुंजाम
अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजाम यांनी अन्न तपासणी प्रक्रिया, नमुना संकलन, प्रयोगशाळा तपासणी, नोटीस व कारवाईची कार्यपद्धती यांची माहिती दिली. व्यावसायिकांनी FSSAI परवाना वेळेवर नूतनीकरण करणे, आवश्यक नोंदी अद्ययावत ठेवणे व तपासणीदरम्यान प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशासनाचा उद्देश दंडात्मक कारवाई नसून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण हाच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नियमपालनातूनच ग्राहक विश्वास – चंद्रकांत पतरंगे
हॉटेल असोसिएशन गडचिरोलीचे अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय हा केवळ नफ्यापुरता मर्यादित नसून तो थेट ग्राहकांच्या आरोग्याशी व विश्वासाशी निगडित आहे. शासनाने ठरवून दिलेले अन्न सुरक्षा नियम हे ओझे न समजता व्यवसायाची ओळख व विश्वासार्हता वाढविण्याचे साधन म्हणून स्वीकारले पाहिजेत.
नमुना सहाय्यकांचे तांत्रिक मार्गदर्शन
यावेळी नमुना सहाय्यक मारुती गोडे यांनी अन्न नमुना संकलनाची प्रक्रिया, नियम व तपासणीदरम्यान घ्यावयाची काळजी याबाबत तांत्रिक माहिती दिली.
बैठकीस हॉटेल असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व उपहारगृह चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी रहीम डोढीया यांनी उपस्थितांचे आभार मानले. बैठकीच्या यशस्वी आयोजनासाठी हॉटेल असोसिएशन गडचिरोलीचे पदाधिकारी व सदस्य तसेच हॉटेल लँडमार्कचे संचालक व कर्मचारीवृंदाचे विशेष आभार व्यक्त करण्यात आले.











