मानव–वन्यजीव संघर्ष उग्र : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

159

मानव–वन्यजीव संघर्ष उग्र : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

लोकवृत्त न्यूज
नागभीड : चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात मानव–वन्यजीव संघर्षाने पुन्हा एकदा उग्र स्वरूप धारण केले असून मंगळवारी (दि. १३) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास तोरगाव गावाजवळील टेकरी शिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाऊराव विठोबा राऊत (वय ६०, रा. तोरगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते नेहमीप्रमाणे शेतात काम करत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हल्ला इतका भीषण होता की भाऊराव राऊत यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलीस व वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागभीड येथील वनपरिक्षेत्र अधिकारी भारती बगमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
या घटनेमुळे मृत शेतकऱ्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून तोरगाव गावात शोककळा पसरली आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे मानव–वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिक व शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.