क्षणात उद्ध्वस्त झाला संसार ; लांझेड्यात घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान

430

क्षणात उद्ध्वस्त झाला संसार ; लांझेड्यात घराला भीषण आग, लाखोंचे नुकसान

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : शहरातील लांझेडा वार्डातील महादेव मंदिराजवळ असलेल्या राजू वखरे यांच्या घराला मंगळवार (दि. १३) रोजी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास फ्रिजमधील शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करत घरातील संपूर्ण संसार जळून खाक झाला असून या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

घटनेच्या वेळी घरात असलेल्या वखरे यांच्या तीन मुलींनी प्रसंगावधान राखत धैर्याने घराबाहेर पडून आरडाओरड केली. त्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली. माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र अरुंद रस्त्यामुळे अग्निशामक वाहन घटनास्थळी पोहोचू शकले नाही.

या आगीत फ्रिज, टीव्ही, आरओ मशीन, कपडे, भांडी, गॅस शेगडी, फॅन, मिक्सर, दागिने, सुमारे ८० हजार रुपये रोख रक्कम तसेच शाळा व नोकरीची महत्त्वाची कागदपत्रे पूर्णतः जळून खाक झाली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वखरे कुटुंब अक्षरशः उघड्यावर आले आहे. घटनेची नोंद गडचिरोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्रशासनाने तातडीची मदत करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.