चंद्रपूर–गडचिरोली मार्गावर भीषण अपघात ; दोघे जागीच ठार, एक गंभीर

518

चंद्रपूर–गडचिरोली मार्गावर भीषण अपघात ; दोघे जागीच ठार, एक गंभीर

लोकवृत्त न्यूज 
सावली : चंद्रपूर–गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर सावली तालुक्यातील हिरापूर फाट्याजवळ गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक युवक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मोहूर्ली येथील नागेंद्र पत्रुजी भगत, वैभव पुरुषोत्तम म्हशाखेत्री व सौरभ मांडवकर हे तिघे एमएच-३३ बी-७९८६ क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत असताना हिरापूर फाट्याजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत नागेंद्र पत्रुजी भगत, वैभव पुरुषोत्तम म्हशाखेत्री यांचा जागीच मृत्यू झाला, तर सौरभ मांडवकर हा युवक गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताची माहिती मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रदीप पुलरवार आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, मुल येथे पाठविण्यात आले असून गंभीर जखमी सौरभ मांडवकर याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघातानंतर घटनास्थळी रक्तरंजित दृश्ये पाहून नागरिक स्तब्ध झाले होते. सदर अपघात नेमका कसा घडला, अज्ञात वाहन कोणते होते, याबाबत सावली पोलीस पुढील तपास करीत असून अपघातानंतर वाहन पसार झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.