Home Breaking News भरधाव ट्रॅक्टरची पलटी; दोघे जागीच ठार, दोन गंभीर

भरधाव ट्रॅक्टरची पलटी; दोघे जागीच ठार, दोन गंभीर

356

भरधाव ट्रॅक्टरची पलटी; दोघे जागीच ठार, दोन गंभीर

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गांगलवाडी नजीकच्या गोगाव–सायगाव मार्गावर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भरधाव ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, जनकापूर येथील एक ठेकेदार लाकूड कापणीच्या कामासाठी जंगल परिसरात गेले होते. लाकडाची कटाई पूर्ण करून गावाकडे परतत असताना ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३४ एल ७३४३ (महिंद्रा टर्बो) हा चालक प्रमोद गजबे (वय ४०) निष्काळजीपणे व भरधाव वेगाने चालवत होता. गोगाव–सायगाव मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्यात ट्रॅक्टर गेल्याने ट्रॉलीसह पलटी झाला. अपघातावेळी ट्रॅक्टरवर बसलेले सात जण दबले गेले.
या भीषण अपघातात प्रविण प्रकाश भोयर (वय ३५) व शिवाजी दोडके (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेमदास ऊरकुडा भजगवळी (वय ५०) व निलकंठ जराते हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इतर दोघांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी दाराशिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल खोब्रागडे तसेच पोलीस उपनिरीक्षक बालाजी चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

Don`t copy text!