भरधाव ट्रॅव्हल्सची एसटी बसला पाठीमागून धडक; 20 प्रवासी जखमी

1053

– 50 हजारांचे नुकसान, गडचिरोली–आरमोरी मार्गावरील अपघातांवर प्रश्नचिन्ह

लोकवृत्त न्यूज
आरमोरी दि.१९ :- गडचिरोली–आरमोरी मार्गावर चुरमुरा गावानंतरच्या वळणाजवळ सोमवारी (दि. 19) सकाळी घडलेल्या भीषण अपघातात भरधाव ट्रॅव्हल्सने एसटी बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील तब्बल 20 प्रवासी जखमी झाले असून एसटी बसचे सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, बस चालक शत्रुघण लहानुजी मगरे (वय 50) हे एसटी बस क्रमांक MH14 LX–5926 घेऊन गडचिरोली–आरमोरी–कासवी–फरी–वडसा या मार्गावर प्रवाशांसह सकाळी सुमारे 9 वाजता मार्गस्थ झाले होते. चुरमुरा गाव ओलांडल्यानंतर आरमोरीकडे जाणाऱ्या पहिल्या वळणाजवळ समोरून येणारे ट्रक एकमेकांना ओव्हरटेक करीत असल्याने संभाव्य धोका टाळण्यासाठी त्यांनी बसचा वेग कमी करून वाहन रस्त्याच्या डाव्या कडेला घेतले.
याच वेळी बसच्या पाठीमागून येणाऱ्या MH 34-AB-8320 क्रमांकाच्या ट्रॅव्हल्सच्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवत थेट बसला मागून धडक दिली. या धडकेत ट्रॅव्हल्समधील 20 प्रवासी जखमी झाले, तर एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अपघातानंतर जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, गडचिरोली–आरमोरी हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असून लोहखनिज वाहतूक करणारे शेकडो ट्रक दररोज या मार्गावरून ये-जा करतात. अरुंद रस्ता असतानाही ओव्हरटेकचे प्रकार सर्रास घडत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यातच गडचिरोली–नागपूर मार्गावर धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या भरधाव वाहनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासनाने यावर तातडीने लगाम घालण्याची गरज व्यक्त केली जात आहे.