सुशीला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने निकतवाडा येथे मोफत आरोग्य शिबिर

155

११८ नागरिकांनी घेतला लाभ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली / घोट : सुशीला वाकडे बहुउद्देशीय संस्था, निकतवाडा यांच्या वतीने शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निकतवाडा येथे मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची तपासणी व जनजागृती हा उद्देश ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन ग्रामपंचायत घोटच्या सरपंच सौ. रुपाली दुधाबावारे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विशाल दहिवले (समिती अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर घोट) होते. तर सुशीला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गोकुळदास वाकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर वर्षा शेट्टे (ग्रामपंचायत सदस्य, घोट), वर्षा नेवारे (ग्रामसंघ महिला बचत गट, निकतवाडा), प्रदीप वाकडे (बौद्ध समाज सचिव, निकतवाडा), वनिता पोरेड्डीवार (ग्रामपंचायत सदस्य, घोट), उर्मिला पोगुलवार (माजी तंटामुक्ती अध्यक्ष, घोट), सीताराम बारसागडे (प्रतिष्ठित नागरिक, निकतवाडा) तसेच डॉ. आशुतोष जावडेकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली असून पाहुण्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था सचिव प्रियंका शेंडे यांनी केले. “आरोग्य हीच खरी संपत्ती असून ती जपण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले. मान्यवरांनी आपल्या भाषणातून नागरिकांना आरोग्याविषयी मार्गदर्शन करत अशा शिबिरांचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले.
या शिबिरात बाहेरून आलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमूने सेवा दिली. यामध्ये डॉ. आशुतोष जावडेकर (दंत शल्यचिकित्सक), डॉ. आकरे (वैद्यकीय अधिकारी), डॉ. प्रांजय हर्ष (नेत्रतज्ज्ञ, गडचिरोली), तसेच नागेश मादेशी (समुपदेशक – ICIC) व त्यांच्या सहकारी वैद्यकीय पथकाचा समावेश होता. शिबिरात रक्तदाब, मधुमेह, हिमोग्लोबिन, नेत्र तपासणी, दंत तपासणी तसेच सर्वसाधारण आरोग्य तपासणी करण्यात आली. एकूण ११८ नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरादरम्यान नागरिकांसाठी चहा व नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच तपासणीसाठी आलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी भोजनाची उत्तम सोय करण्यात आली.
या यशस्वी आरोग्य शिबिरासाठी सुशीला बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व कार्यकारी मंडळासह दिलीप खोब्रागडे, मुरलीधर देवातळे, खुशाल खोब्रागडे, आकांक्षा डोंगरे, स्मिता खोब्रागडे, संध्या वाकडे, जोसना खोब्रागडे, छब्बू फुलझेले, सविता खोब्रागडे व पलक वैरागडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप खोब्रागडे यांनी केले, तर शेवटी खुशाल खोब्रागडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.