विद्यार्थ्यांच्या पावलांतून उमटली राष्ट्रीय एकता : जि. प. महाविद्यालयाची भव्य एकात्मता रॅली

131

विद्यार्थ्यांच्या पावलांतून उमटली राष्ट्रीय एकता : जि. प. महाविद्यालयाची भव्य एकात्मता रॅली

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी : जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, चामोर्शी येथे आयोजित स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने ‘राष्ट्रीय एकात्मता’ या संकल्पनेवर आधारित भव्य आणि प्रेरणादायी एकात्मता रॅली काढण्यात आली. या रॅलीतून विद्यार्थ्यांनी भारताच्या विविध राज्यांच्या संस्कृतीचे सजीव दर्शन घडवत संपूर्ण चामोर्शी शहरात राष्ट्रप्रेमाची लाट उसळवली.
दरवर्षी प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर ज्या पद्धतीने विविध राज्यांचे चित्ररथ सादर होतात, त्याच धर्तीवर या शैक्षणिक संस्थेने अभिनव उपक्रम राबवला. प्रत्येक वर्गाने एका राज्याचे प्रतिनिधित्व करत त्या-त्या राज्याची पारंपरिक वेशभूषा परिधान केली होती. पंजाब, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक आदी राज्यांच्या संस्कृतीचे दर्शन घडवत विद्यार्थ्यांची ही रॅली विद्यालयाच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडून मुख्य महामार्गावरून मार्गक्रमण करताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले.
“भारत माता की जय”, “वंदे मातरम्” तसेच “कश्मीर ते कन्याकुमारी, भारत माता एक हमारी”, “प्रांत-भाषेचा भेद न मानू, भारतमातेचीच संतान” अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण चामोर्शी शहर दुमदुमून गेले. या घोषणांमुळे नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व एकात्मतेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.
विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, बंधुता आणि राष्ट्रीय एकात्मतेची मूल्ये रुजावीत, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या भव्य रॅलीची संकल्पना विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक अविनाश तालापल्लीवार यांच्या कल्पकतेतून साकारण्यात आली.
या एकात्मता रॅलीचे उद्घाटन माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा जयश्रीताई वायलालवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मंदाताई वानखेडे, गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे, ॲड. सौ. प्रेमाताई आईंचवार, युवा वक्ते तुषार दुधबावरे, प्राचार्या मीना गद्देवार, दिलीपजी चलाख, पुरुषोत्तम घ्यार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मागील अनेक दिवसांपासून परिश्रम घेतले.
जि. प. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेली ही एकात्मता रॅली चामोर्शीच्या सामाजिक व शैक्षणिक जीवनात राष्ट्रप्रेमाचा जागर करणारी ठरली, अशी प्रतिक्रिया नागरिक व पालकांनी व्यक्त केली.