गडचिरोलीत ‘कोया कृषि कुंभ २०२६’चे भव्य आयोजन

227

गडचिरोलीत ‘कोया कृषि कुंभ २०२६’चे भव्य आयोजन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) गडचिरोली व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कोया कृषि कुंभ २०२६’ या भव्य कृषि मेळाव्याचे आयोजन ०५ ते ०९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कृषि महाविद्यालय प्रांगण, चंद्रपूर रोड, सोनापूर, गडचिरोली येथे करण्यात आले आहे. या कृषि कुंभ अंतर्गत शेतमाल विक्री मेळावा, खरेदीदार-विक्रेता संमेलन, विविध चर्चासत्रे, परिसंवाद व तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली असून शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजना, संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण व्यवस्थापन, बाजारपेठ व्यवस्थापन व कृषीपूरक व्यवसायांविषयी माहिती देण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन गुरुवार, ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न होणार आहे. यावेळी राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार) तथा सहपालकमंत्री गडचिरोली जिल्हा आशिष जयस्वाल हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
कोया कृषि कुंभचे प्रमुख आकर्षण म्हणून ११११ किलो नाचणी शिरा सादर करण्यात येणार असून हा उपक्रम सर्वांचे लक्ष वेधून घेणार आहे. या मेळाव्यात २५० पेक्षा अधिक स्टॉल्स, जैविक शेतीची प्रात्यक्षिके, शासकीय योजनांचे मार्गदर्शन दालन, कृषी यांत्रिकीकरणाचे सादरीकरण, महिला बचत गटांसाठी विशेष दालन, खवय्यांसाठी मेजवाणी तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कृषि कुंभमध्ये कृषी व कृषीपूरक व्यवसायांचा व्यापक समावेश करण्यात आला असून यामध्ये यंत्रसामग्री, सौर ऊर्जा साधने, ट्रॅक्टर्स व सिंचन उपकरणे, मत्स्य व पशुसंवर्धन, मधमाशी पालन, ड्रोन व फवारणी यंत्रे, नैसर्गिक व जैविक शेती, डेअरी, पॉलीहाऊस, कृषी पर्यटन, बांबू उत्पादन, वनउपज व रानभाज्या, औषधी पिके तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांबाबत मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रत्येक शेतकऱ्याला उद्योगाची संधी उपलब्ध करून देणे हा या कृषि कुंभचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमास खासदार नामदेव किरसान, आमदार मिलिंद नरोटे, धर्मरावबाबा आत्राम, रामदास मसराम, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी व सुधाकर अडबाले, नगराध्यक्षा प्रणोती सागर निंबोरकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाटगे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
कृषि कुंभच्या कालावधीत दोन सभागृहांमध्ये गौण वनउपज व्यवस्थापन, मधमाशी पालन, नैसर्गिक शेती, मत्स्य व पशुसंवर्धन, बांबू लागवड, स्वदेशी बियाणे संवर्धन, कृषी यांत्रिकीकरण, कृषी पर्यटन, वनउपज प्रक्रिया, शेतकरी उत्पादक कंपन्यांची भूमिका, PMFME योजना, आदर्श गाव संकल्पना व जलसाक्षरता अशा विविध विषयांवर नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत.
या भव्य ‘कोया कृषि कुंभ २०२६’चा लाभ शेतकरी, शेतकरी गट, उद्योजक व नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रिती म. हिरळकर यांनी केले आहे.