प्रेमसंबंधातून झाली हत्या, ७२ तासांत उलगडा, पाच अटकेत

690

कोरची : प्रेमसंबंधातून झाली हत्या, ७२ तासांत उलगडा, पाच अटकेत

लोकवृत्त न्यूज
कोरची | दि. ०४ :- तालुक्यातील बोगाटोला जंगल परिसरात अर्धवट पुरलेल्या अवस्थेत सापडलेल्या अज्ञात इसमाच्या खुनाचा गडचिरोली पोलिसांनी अवघ्या ७२ तासांत उलगडा करत पाच आरोपींना अटक केली आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने मयताची ओळख पटविणे तसेच गुन्ह्याचा छडा लावणे हे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. मात्र पोस्टे कोरची व स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कसून तपासामुळे प्रेमसंबंधातून झालेल्या या खुनाचा पर्दाफाश झाला.
३१ जानेवारी २०२६ रोजी बोगाटोला जंगलात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट पुरलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मृतदेहाचा चेहरा पूर्णतः कुजलेला असल्याने ओळख पटविणे शक्य नव्हते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळावरील पुरावे, तांत्रिक विश्लेषण तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
वैद्यकीय अहवालात मयताचा मृत्यू मानेवर धारदार शस्त्राने वार केल्याने झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर २ फेब्रुवारी २०२६ रोजी पोस्टे कोरची येथे अप.क्र. १९/२०२६, कलम १०३(१), २३८ भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात मृत व्यक्तीची ओळख जितू कवंर (वय ३०), रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छत्तीसगड) अशी निष्पन्न झाली.
पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली. आरोपी शानु पठाण (रा. जांभूळखेडा, ता. कुरखेडा) याचे मयताच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. या संबंधात जितू कवंर अडसर ठरत असल्याने आरोपीने पूर्वनियोजित कट रचला. जितू कवंर हा खुर्शीपार (ता. कोरची) येथे आलेला असताना आरोपी व त्याच्या साथीदारांनी धारदार शस्त्राने मानेवर वार करून त्याचा खून केला. खून केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जंगलात नेऊन अर्धवट पुरून ठेवण्यात आला.
या प्रकरणी आरोपी शानु पठाण (वय ३६), पुंकेश बोरकर (वय ३२), चंद्रशेखर गुज्जेवार (वय २७), धनपाल मडावी (वय २१), सर्व रा. जांभूळखेडा, ता. कुरखेडा, जि. गडचिरोली तसेच सोनाली कवंर (वय २५), रा. जेठकन्हार, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छ.ग.) यांना ४ फेब्रुवारी २०२६ रोजी अटक करण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोस्टे कोरचीचे पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे करीत असून ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली व पोस्टे कोरचीच्या पथकाने संयुक्तपणे पार पाडली.