रस्ता बांधकामाने घेतला बळी : टँकरखाली चिरडून शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

649

रस्ता बांधकामाने घेतला बळी : टँकरखाली चिरडून शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली–धानोरा राज्य महामार्गावर सुरू असलेल्या रस्ता बांधकामातील निष्काळजीपणाचा भयानक परिणाम आज पुन्हा समोर आला. पाणी फवारणीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरच्या धडकेत १६ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना धानोरा रोडवरील जांभळी परिसरात दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरून गेला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मृत विद्यार्थिनीचे नाव रिया श्रावण पदा (वय १६) असून ती कारवाफा येथील रहिवासी होती. रिया ही कारवाफा येथील शाळेत इयत्ता दहावीत शिक्षण घेत होती. शाळा सुटल्यानंतर नेहमीप्रमाणे सायकलवरून घरी परतत असताना जांभळी गावाच्या सुरुवातीलाच काळाने तिच्यावर झडप घातली.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, रस्ता बांधकामाच्या ठिकाणी पाणी मारण्याचे काम करणारा टँकर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा गंभीर आरोप आहे. कोणतीही खबरदारी न घेता, महामार्गासारख्या वेगाने टँकर चालविताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि टँकर थेट रियाच्या अंगावर आली. धडक इतकी भीषण होती की टँकरचे चाक रियाच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी रक्ताचे थारोळे आणि भीषण दृश्य होते.
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. संतप्त नागरिकांनी रस्ता बांधकामातील बेजबाबदारपणा, सुरक्षा उपायांचा पूर्ण अभाव आणि मद्यधुंद वाहनचालकांविरोधात तीव्र रोष व्यक्त केला. रस्ता बांधकाम म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. टँकर चालकावर तात्काळ कठोर कारवाई करावी, संबंधित कंत्राटदारावर गुन्हा दाखल करावा आणि बांधकामस्थळी सुरक्षा नियमांची सक्तीने अंमलबजावणी करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून टँकर चालकाला ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे. या दुर्दैवी घटनेमुळे कारवापा व जांभळी परिसरात शोककळा पसरली असून एका निष्पाप विद्यार्थिनीच्या मृत्यूने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.