गडचिरोली : पोलिस–नक्षल चकमकीत C-60 जवान शहीद, तीन नक्षल ठार

251

गडचिरोली : पोलिस–नक्षल चकमकीत C-60 जवान शहीद, तीन नक्षल ठार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.६ : अबुजमाडच्या दुर्गम व घनदाट जंगलात सुरू असलेल्या माओवादीविरोधी अभियानादरम्यान पोलिस व नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले असून C-60 पथकातील एक शूर जवान शहीद झाला आहे. या घटनेने गडचिरोली जिल्हा हादरून गेला असून संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे.
घटनास्थळावरून आज सकाळी आणखी दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह हस्तगत करण्यात आले. त्यामध्ये एक पुरुष व एक महिला नक्षलवादीचा समावेश आहे. याआधी एका नक्षलवाद्याचा मृतदेह सापडला होता. आतापर्यंत एकूण तीन नक्षलवादी (दोन पुरुष व एक महिला) ठार झाले असून त्यांच्याकडून एक एके–४७ व एक एसएलआर रायफल जप्त करण्यात आली आहे. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या चकमकीत गंभीर जखमी झालेले C-60 जवान दिपक चिन्ना मडावी (वय ३८, सध्या राहणार अहेरी, मूळ रा. मांड्रा, दामरांचा, ता. अहेरी) यांना आज पहाटे हेलिकॉप्टरच्या मदतीने अबुजमाडच्या जंगलातून उपजिल्हा रुग्णालय, भामरागड येथे आणण्यात आले होते. मात्र अभियानादरम्यान झालेल्या गंभीर जखमांमुळे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दरम्यान, या चकमकीत आणखी एक जवान जोगा मडावी (रा. किष्टयापल्ली) हे गोळी लागून जखमी झाले होते. त्यांनाही तत्काळ हेलिकॉप्टरद्वारे भामरागड येथे हलविण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. पुढील उपचारासाठी त्यांना लवकरच गडचिरोली येथे हलविण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, अबुजमाडच्या संपूर्ण जंगल परिसरात शोधमोहीम तीव्र करण्यात आली असून संभाव्य नक्षल हालचाली लक्षात घेता सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.