Home Breaking News शिक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

शिक्षकांच्या मानसिक त्रासाला कंटाळून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

454

चामोर्शीतील खळबळजनक प्रकार

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी, दि.६ :- शहरातील केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या अनिकेत गजेंद्र सोनटक्के (वय २४, रा. आरमोरी) या विद्यार्थ्याने शिक्षकांच्या सातत्यपूर्ण मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, इतर विद्यार्थ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचे प्राण वाचले.
सदर प्रकरणात प्रा. तुषार भांडारकर व प्रा. पवन दुधबावरे या शिक्षकांची नावे पुढे आली असून त्यांनी अनिकेतसह इतर विद्यार्थ्यांना मानसिकरित्या त्रस्त करून परीक्षेत पास होण्यासाठी कथितरित्या आर्थिक व्यवहारांची मागणी केल्याचे आरोप आहेत. याशिवाय, शिक्षकांकडून विद्यार्थिनींविषयी अश्लील वर्तन, छेडछाड आणि अब्रूप्रश्न निर्माण करणाऱ्या कृतींचाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
अनिकेतने आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत त्रासाच्या घटनांचा उल्लेख केला असून, “पदवी पूर्ण करायची असेल तर पैसे द्या, अन्यथा १० वर्षे लागतील” अशा धमक्या मिळाल्याचे त्याने नमूद केले आहे. या सर्व प्रकारांमुळे त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता.
घटनेनंतर विद्यार्थ्यांनी संस्थेच्या व्यवस्थापनाकडे संबंधित शिक्षकांवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. पालकवर्गामध्येही संतापाची लाट उसळली असून, दोषींवर कडक शिस्तभंगाची कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला जात आहे.
ही घटना महाविद्यालयीन शिक्षण व्यवस्थेतील बेशिस्त, अनैतिकता आणि विद्यार्थ्यांच्या मनोबलावर होणाऱ्या आघाताचे भीषण उदाहरण ठरत आहे. प्रशासन आणि संस्थेने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी सर्वत्र होत आहे

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal #student )

Don`t copy text!