स्थानिक गुन्हे शाखा व धानोरा पोलिसांची संयुक्त कारवाई, शेतकऱ्यावर गुन्हा दाखल…
लोकवृत्त न्यूज
ता./प्र.धानोरा(गडचिरोली) दि.15:- पोलीस स्टेशन धानोराच्या हद्दीतील मौजा मोहली येथील एका शेतात अवैध गांजाची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखा (स्थागुशा) गडचिरोली व धानोरा पोलिसांनी संयुक्तरीत्या पोलीस कर्मचारी आणि पंचांसमक्ष मौजा मोहली येथील शेतशिवारात जाऊन छापा टाकला. या कारवाईदरम्यान शेतकरी ईश्वर सखाराम पुंघाटे (वय ५० वर्ष, रा. मोहली) यांनी आपल्या शेतात कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीरपणे गांजाच्या झाडांची लागवड केल्याचे प्रत्यक्ष दिसून आले.
त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संबंधित शेतातून तब्बल १३६.२५ किलोग्रॅम वजनाचा अवैध गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण गांजाची अंदाजे बाजारपेठ किंमत ६८,१२,५०० रुपये (अडुसष्ट लाख बारा हजार पाचशे रुपये) इतकी आहे. या प्रकरणी विनापरवाना गांजाची शेती करणाऱ्या शेतकरी ईश्वर पुंघाटे यांच्याविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायदा म्हणजेच एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ च्या कलम ८ (क) आणि २० (ब)(२) (क) नुसार कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची यशस्वी कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश, अप्पर पोलीस अधीक्षक गोकूळराज, उपविभागीय पोलीस अधिकारी (धानोरा) श्री. जगदिश पांडे आणि पोलीस निरीक्षक अरुण फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या छाप्यात नायब तहसीलदार देवेंद्र वाळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक भगतसिंग दुलत, पोलीस हवादार भजनराव गावडे, नायक पोलीस कॉन्स्टेबल गितेश्वर बोरकुटे, तसेच पोलीस शिपाई प्रविण राऊत, मंगेश राऊत, मारोती वाडगुरे, श्रीकृष्ण कळाबे आणि सुशील मेश्राम यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.














