Home Breaking News अवैध मुरूम वाहतुकीवर महसूलचा दणका

अवैध मुरूम वाहतुकीवर महसूलचा दणका

367

​​मोहलीजवळ वाहन जप्त

​लोकवृत्त न्यूज
ता. प्र.धानोरा( गडचिरोली ) दि.१४ :- तालुक्यातील रांगी महसूल मंडळांतर्गत येणाऱ्या मौजा मोहली येथे महसूल विभागाने आज मोठी कारवाई केली. सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास मोहली परिसरात अवैध रितीने मुरूमाची वाहतूक होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे महसूल पथकाने सापळा रचून एम एच ३३ ए डी ४६८७ या क्रमांकाचे वाहन अडवले. प्राथमिक चौकशीत हे वाहन कीमदेव मेश्राम (राहणार मोहली, ता. धानोरा) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. कोणत्याही वैध परवानगीशिवाय मुरूमाची वाहतूक केली जात असल्याचे स्पष्ट होताच महसूल पथकाने हे वाहन ताब्यात घेतले.
सदर कारवाई तहसीलदार गणेश माळी यांच्या थेट मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईच्या वेळी पथकात नायब तहसीलदार देवेंद्र वाळके आणि नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे यांचा समावेश होता. त्यांना महसूल सहायक हितेश लांजेवार व महसूल सेवक योगेश नरचुलवार यांनी तांत्रिक आणि क्षेत्रीय कामात सहकार्य केले. घटनास्थळाचा पंचनामा करून जप्त केलेले वाहन तात्काळ धानोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून प्रशासकीय स्तरावर पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविली जात आहे.
धानोरा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक वाढल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर महसूल विभागाने आपली कारवाई तीव्र केली आहे. विनापरवाना नैसर्गिक संपत्तीची लूट करणाऱ्यांविरोधात यापुढेही कठोर पावले उचलली जातील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. मोहली परिसरात या कारवाईमुळे अवैध मुरूम माफियांचे धाबे दणाणले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याचेही संकेत तहसीलदार गणेश माळी यांनी दिले आहेत.

Don`t copy text!