Home Breaking News गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ : ड्रॅगन फ्रूट, आंबा, पेरू बागांचे मोठे नुकसान

गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ : ड्रॅगन फ्रूट, आंबा, पेरू बागांचे मोठे नुकसान

153

गडचिरोलीत रानटी हत्तींचा धुमाकूळ : ड्रॅगन फ्रूट, आंबा, पेरू बागांचे मोठे नुकसान

लोकवृत्त न्यूज  गडचिरोली, दि. १६ : गडचिरोली जिल्ह्यातील कळमटोला चक परिसरात रानटी हत्तींच्या कळपाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत युवा शेतकऱ्यांच्या आधुनिक फळबागा उद्ध्वस्त केल्या आहेत. १५ मे च्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेत आशिष ठाकरे व राज ठाकरे या युवा शेतकऱ्यांच्या ड्रॅगन फ्रूट, आंबा, पेरू व इतर फळपिकांच्या बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लाखो रुपयांचा फटका बसल्याने परिसरातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

नाविन्यपूर्ण शेतीचा आदर्श उभा करत संबंधित शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने ड्रॅगन फ्रूट लागवडीसाठी मजबूत पोल, जाड कुंपण व आधुनिक ठिबक सिंचन व्यवस्था उभारली होती. मात्र मध्यरात्री रानटी हत्तींच्या कळपाने शेतात घुसून अक्षरशः हैदोस घातला. हत्तींच्या धडकेत तब्बल ३० ते ४० ड्रॅगन फ्रूटचे पोल उखडून पडले, तर संपूर्ण ड्रिप इरिगेशन व्यवस्था, पाईपलाइन, सिंचन साहित्य आणि कुंपणाची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली. याशिवाय आंबा, पेरू व इतर फळझाडेही उद्ध्वस्त झाली आहेत. एका रात्रीत अनेक वर्षांची मेहनत व लाखोंची गुंतवणूक मातीमोल झाल्याने शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचले आहेत.

याच परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या मका पिकालाही हत्तींच्या कळपाने मोठा फटका दिला असून संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास ग्रामस्थ धजावत नसल्याचे चित्र आहे. वारंवार होणाऱ्या हत्तींच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वन विभागाकडे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. कळमटोला परिसराचा मानव-हत्ती संघर्षग्रस्त क्षेत्रात समावेश करावा, विशेष वन पथक नियुक्त करावे, गावांमध्ये अलर्ट सिस्टीम व सायरन यंत्रणा बसवावी, सोलर फेन्सिंग योजना तातडीने राबवावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पंचनामा करून वाढीव नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा वन विभाग कार्यालय, गडचिरोली येथे धरणे आंदोलन छेडण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात आधुनिक शेतीच्या माध्यमातून अनेक युवा शेतकरी रोजगार व उत्पन्नाचे नवे मार्ग निर्माण करत आहेत. मात्र वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे त्यांच्या स्वप्नांवर संकट उभे राहत असल्याने शासन व वन विभागाने तातडीने ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज व्यक्त होत आहे.

Don`t copy text!