निरोप देताना दाटले कंठ; धानोरा हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप

165

निरोप देताना दाटले कंठ; धानोरा हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा भावनिक निरोप

लोकवृत्त न्यूज
धानोरा : “पाऊले चालती पुढच्या वाटेवर, आठवणी मात्र राहतील याच शाळेच्या उंबरठ्यावर…” या ओळी जिल्हा परिषद हायस्कूल, धानोरा येथे साकारल्या गेल्या. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ हा केवळ औपचारिक कार्यक्रम न राहता गुरु–शिष्य नात्याचा हळवा, भावनिक सोहळा ठरला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वागतगीताने झाली. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही. एम. सुरजुसे होते. दहावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत, “ही शाळा आमचे दुसरे घर आहे,” अशी भावना व्यक्त केली. शिक्षकांनी दिलेली शिस्त, प्रेम आणि मार्गदर्शन यामुळेच आमचे व्यक्तिमत्त्व घडले, अशी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या रिमिक्स नृत्याने वातावरणात उत्साह निर्माण केला. मात्र निरोपाच्या क्षणी सर्वांच्याच डोळ्यांत अश्रू दाटले. शाळेच्या स्मरणार्थ दहावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला दोन मॅटिंग व नोटीस बोर्ड भेट देत एक अनुकरणीय आदर्श निर्माण केला.
मुख्याध्यापक सुरजुसे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना, “तुम्ही शाळेचा अभिमान आहात. यशाच्या शिखरावर पोहचा; मात्र आपली माती आणि शाळा कधीही विसरू नका,” असे प्रेरणादायी शब्द उच्चारले.
या वेळी शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. वेणूताई मशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी, ज्येष्ठ शिक्षक पी. व्ही. साळवे, पी. बी. तोटावार, डॉ. रश्मी डोके यांच्यासह बुरमवार, कोरेवार, शेंडे, देशमुख, भालेराव, श्रीमती चेलमेलवार, गीता जुनघरे व कीर्ती शिंगरूपवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुरेख संचालन कु. रुतुल देशमुख व कु. अमृता परचाके यांनी केले. उपस्थितांचे आभार कु. आचल तोडासे हिने मानले. यशस्वी आयोजनासाठी वर्गशिक्षक कु. रजनी मडावी व एस. एम. रत्नागिरी यांनी विशेष परिश्रम घेतले.