धानोरा रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी; व्यवस्थांबाबत व्यक्त केली नाराजी

278

धानोरा उपजिल्हा रुग्णालयाचे काम मार्गी लावणार; १०८ रुग्णवाहिकेसह आरोग्य व्यवस्था बळकटीकरणाचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आश्वासन

लोकवृत्त न्यूज
ता.प्र.​/धानोरा दि. १४ :- महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह आज धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन सदिच्छा पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची बारकाईने पाहणी केली. मात्र, रुग्णालयातील काही त्रुटी आणि अपुऱ्या व्यवस्थांबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
​तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश
पाहणी दरम्यान आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला कडक शब्दात समज दिली. रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे हा त्यांचा हक्क आहे. डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णांशी सौजन्यपूर्ण व्यवहार करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, क्षुल्लक कारणावरून रुग्णांना इतरत्र ‘रेफर’ करण्याचे प्रमाण तातडीने कमी करून स्थानिक पातळीवरच दर्जेदार उपचार देण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

धानोरा तालुक्यासाठी महत्त्वाच्या घोषणा
धानोरा येथील रखडलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामाबाबत या भेटीत सकारात्मक चर्चा झाली. हे बांधकाम प्राधान्याने आणि लवकरात लवकर पूर्ण केले जाईल, असे आश्वासन ना. आबिटकर यांनी दिले. तसेच धानोरा तालुक्याची भौगोलिक परिस्थिती पाहता, आपत्कालीन सेवेसाठी आणखी एक ‘१०८ रुग्णवाहिका’ उपलब्ध करून देण्याचे संकेतही त्यांनी दिले.
​आरोग्य व्यवस्था होणार सक्षम
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी यावेळी तालुक्यातील आरोग्य समस्यांबाबत आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. ही संयुक्त भेट धानोरा तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेला नवीन उभारी देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​”धानोरा तालुक्यातील जनतेला उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आरोग्यमंत्र्यांच्या या भेटीमुळे रुग्णालयाचे प्रश्न लवकरच सुटतील आणि उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न पूर्ण होईल.”
साजन गुंडावर भाजपा तालुका अध्यक्ष, धानोरा