थातूरमातूर चौकशीचा आरोप; चामोर्शीतील महिलांचे आमरण उपोषण तीव्र, दोघी रुग्णालयात

428

नगरसेवक दाम्पत्यावर कोट्यवधींच्या फसवणुकीचे गंभीर आरोप

लोकवृत्त न्यूज
चामोर्शी दि.२५:- प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या अगरबत्ती प्रकल्पातील कथित आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी न झाल्याच्या आरोपावरून चामोर्शी येथे महिलांनी सुरू केलेले आमरण उपोषण मंगळवारी तीव्र झाले. उपोषणादरम्यान दोघींची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रशासनाच्या कथित थातूरमातूर चौकशीमुळे न्याय मिळत नसल्याचा आरोप करत पीडित महिलांनी संताप व्यक्त केला आहे.
या प्रकरणात नगरसेवक आशिष अरुण पिपरे व नगरसेविका सौ. सोनाली आशिष पिपरे यांच्यावर खोट्या कंपन्या स्थापन करून महिलांच्या नावावर कर्ज काढून अगरबत्ती प्रकल्प उभारल्याचा आरोप करण्यात आला आहे. 2020 मध्ये प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत महिलांना प्रकल्पाची माहिती देत बँकेशी संगनमत करून त्यांच्या नावावर लाखो रुपयांचे कर्ज काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
पीडित महिलांच्या म्हणण्यानुसार, गुजरातमधील अहमदाबाद येथून प्रति मशीन २५,५०० रुपयांना मशीन आणण्यात आल्याचे दाखवून प्रत्यक्षात प्रति मशीन १ लाख रुपये आकारण्यात आले. सुमारे ४५ महिलांना प्रत्येकी दोन मशीन देण्यात आल्याचे सांगितले जाते. काही मशीन प्रत्यक्षात पुरवण्यातच आल्या नसल्याचाही आरोप आहे.
या व्यवहारातून मिळालेल्या पैशांतून आरोपींनी स्वतःसाठी जमीन खरेदी, शेड उभारणी, घरबांधणी व वाहन खरेदी केल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
काही महिन्यांतच अगरबत्ती प्रकल्प बंद पडला. महिलांचा रोजगार थांबला मात्र बँकेचे कर्ज कायम राहिले. तीन वर्षांनंतर बँकांनी कर्जफेडीसाठी नोटिसा पाठवण्यास सुरुवात केली. महिलांनी आरोपींकडे विचारणा केली असता कर्ज तुमच्या नावावर आहे, तुम्हीच भरा असे उत्तर देत धुडकावून लावल्याचा आरोप आहे.
चार वर्षांनंतर संबंधित बँकेने न्यायालयात याचिका दाखल केल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतरच फसवणुकीची जाणीव प्रकर्षाने झाल्याचे महिलांनी सांगितले.
९ फेब्रुवारी २०२६ रोजी महिलांनी लेखी निवेदन व पत्रकार परिषद घेऊन १५ दिवसांत सखोल चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली होती. मात्र राजकीय दबावामुळे अधिकारी प्रकरण दाबून टाकत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. उलट महिलाच चुकीच्या असल्याची अफवा पसरवली जात असल्याचा आरोपही करण्यात आला.
याच प्रकरणात एका महिलेच्या वडिलांच्या नावावरील ट्रॅक्टर नोटरीद्वारे पत्रीच्या नावावर करून घेतल्याचा तसेच चामोर्शी परिसरातील एका शेतकऱ्याची जमीन अधिक मोबदला मिळवून देण्याचे आमिष दाखवून लुबाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आमरण उपोषणादरम्यान अर्चना धोडरे, सुषमा धोडरे व आणखी एका महिलेची प्रकृती खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
आरोपींना तात्काळ अटक करून आर्थिक व्यवहारांची मुळापासून चौकशी करावी, संबंधित बँक अधिकाऱ्यांची भूमिकाही तपासावी आणि महिलांना कर्जमुक्त करून न्याय द्यावा, अशी ठाम मागणी आंदोलक महिलांनी केली आहे.