वसा येथील वैनगंगा नदी पात्रात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

678

वसा येथील वैनगंगा नदी पात्रात बुडून युवकाचा दुर्दैवी मृत्यू

लोकवृत्त न्यूज
आरमोरी, दि. ३ :- वसा येथील वैनगंगा नदी पात्रात ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना मंगळवार ३ मार्च रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास घडली. मुन्ना राजेंद्र भोयर (वय ३२), रा. मोहझरी, ता. जि. गडचिरोली असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, मृतक हा मजुरी करून उदरनिर्वाह करत होता. आज धुलीवंदनाच्या दिवशी दुपारी सुमारे १२.१५ वाजताच्या सुमारास तो आपल्या मित्रांसोबत होळीचा रंग खेळल्यानंतर वसा येथील वैनगंगा नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. पाण्याच्यी खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि बुडाला. सोबत असलेल्या मित्रांनी आरडाओरड करून मदत मागितली; मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. या प्रकरणी मर्ग दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, सण-उत्सवाच्या काळात नदी व तलाव परिसरात जाताना नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.