वैनगंगा नदीत बुडून तरुण अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू

637

वैनगंगा नदीत बुडून तरुण अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.३ :- रंगोत्सवाच्या आनंदावर दुःखाची सावली पडल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आरमोरी येथील गायकवाड चौक परिसरातील २५ वर्षीय शुभम नामदेव रामटेके याचा वैनगंगा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. होळी साजरी केल्यानंतर मित्रांसोबत आंघोळीसाठी गेलेल्या शुभमचा गांगलवाडी टी-पॉईंटजवळ पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने शहरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सुमारे १० वाजताच्या सुमारास शुभम आपल्या काही मित्रांसह वैनगंगा नदीकाठी गेला होता. रंग खेळल्यानंतर सर्वजण आंघोळीसाठी नदीत उतरले. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम खोल पाण्यात गेला. काही क्षणांतच तो पाण्याच्या प्रवाहात बुडाला. मित्रांनी तत्काळ आरडाओरडा करून मदतीचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढण्यात आले मात्र वैद्यकीय तपासणीत डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शुभम हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. वडील कबाड व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी मुलाला उच्च शिक्षण दिले. शुभमने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून दोन महिन्यांपूर्वीच खासगी कंपनीत नोकरी मिळवली होती. घरची परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून कष्ट करणाऱ्या या तरुणाचा अशा प्रकारे झालेला अंत परिसरासाठी धक्कादायक ठरला आहे.

आनंद, उत्साह आणि रंगांनी नटलेल्या होळीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे आरमोरी शहर हळहळ व्यक्त करत आहे. एका क्षणाच्या बेसावधपणामुळे सणाचा आनंद शोकात परिवर्तित झाला. रामटेके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व मित्रपरिवारात शोकसागर उसळला आहे.