ट्रक-पिकअपची समोरासमोर धडक : पिकअप चालक गंभीर जखमी

463

ट्रक-पिकअपची समोरासमोर धडक : पिकअप चालक गंभीर जखमी

लोकवृत्त न्यूज
ता. प्र / धानोरा, दि. ०५ : धानोरा-येरकड मार्गावर जपतलाई फाट्याजवळ आज ५ मार्च ला सकाळी सुमारे ११ वाजताच्या सुमारास ट्रक व पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअप चालक गंभीर जखमी झाला असून ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती आहे.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा येथून येरकडकडे जात असलेला ट्रक (क्र. TG 01 T 1602) आणि येरकडकडून धानोऱ्याकडे येणारा पिकअप (क्र. MH 33 G 2575) यांची जपतलाई फाट्याजवळ समोरासमोर जोरदार टक्कर झाली. धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान या अपघातात दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला. पिकअपचा समोरील भाग पूर्णपणे दबल्याने चालक वाहनात अडकून पडला होता. स्थानिक नागरिक व पोलिसांनी तत्परता दाखवत चालकाला बाहेर काढले.
या अपघातात जखमी झालेल्या पिकअप चालकाचे नाव अविनाश संतोष मोहुर्ले (वय २५, रा. आमगाव, ता. चामोर्शी) असे असून त्याच्या अंगावर गंभीर दुखापती झाल्या आहेत. त्याला तातडीने उपचारासाठी धानोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली असून या घटनेचा पुढील तपास येरकड पोलीस करीत आहेत.