कोंडेखल ग्रामपंचायतीत शासकीय निधीचा २६ लाखांचा अपहार; भ्रष्ट सरपंच व अधिकारी चर्चेत
लोकवृत्त न्यूज
कोंडेखल :- कोंडेखल ग्रामपंचायतीत काम न करताच शासकीय निधी २६ लाखांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंचायत समितीच्या चौकशीत असे स्पष्ट झाले की, सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी काम न करताच निधीचा अपहार करत होते. आता पंचायत समितीने संबंधितांवर अपहार केलेली रक्कम वसूल करून कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस केली आहे.
ग्रामपंचायतीतील तत्कालीन आणि विद्यमान अधिकारी दोघांनीही भ्रष्टाचारात हात घातल्याने, वरिष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांवर किती अंकुश ठेऊ शकतात, याचा प्रत्यय प्रकरणातून येतो. ग्रामस्थ आणि पंचायत सदस्य फक्त कागदोपत्री कारवाई न करता फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आहेत.
कोंडेखल ग्रामपंचायतीतील उपसरपंच नरेश बाबनवाडे, सदस्य श्रीकृष्ण बोदलकर व रोशन वालदे यांनी आर्थिक गैरव्यवहाराची तक्रार केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी देवतळे यांनी चौकशी केली, ज्या मध्ये अनेक न केलेल्या कामांचा खर्च दाखवून निधीवर अपहार केल्याचे स्पष्ट झाले.
सरपंच सरला कोटगले आणि ग्रामसेवकांकडून अपहार केलेली रक्कम वसूल करण्याची शिफारस करण्यात आली असून, विद्यमान अधिकारी धीरधम्म रायपुरे आणि तत्कालीन अधिकारी आनंद देवगडे यांच्यावर जिल्हा परिषद कर्मचारी शिस्त व अपील कलम २९६४(४) नुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र, ग्रामपंचायत सदस्य ठाम आहेत की फौजदारी कारवाई न केल्यास भ्रष्टाचाराचा प्रभाव राहील.
साहित्य खरेदी न करता निधीचा अपहार
१५व्या वित्त आयोगाच्या निधीतून अंगणवाडी, ग्रामपंचायत आणि शाळा येथे कोणतेही साहित्य खरेदी न करता ३ लाख ३ हजार रुपये ‘गणराज ट्रेड’ नावाच्या खरेदीत दाखवले गेले, असे चौकशीत समोर आले आहे.
ग्रामस्थ आणि पंचायत सदस्य या भ्रष्टाचारामुळे मोठ्या प्रमाणात संतप्त असून, कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.













