११ वर्षे पोलिसांना चकवा देणारा खुनी अखेर गजाआड

772

• पहिल्या पत्नीच्या खुनातील जन्मठेपेचा कैदी ओळख लपवून दुसरा संसार, घरगुती वादातून पर्दाफाश

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : तब्बल ११ वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार असलेला जन्मठेपेचा कैदी अखेर गडचिरोली पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. पहिल्या पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला हा आरोपी ओळख लपवून दुसरा संसार थाटून राहत होता. मात्र, घरगुती वादाच्या एका साध्या तक्रारीमुळे त्याचे थरारक गुपित उघडकीस आले.
पुरुषोत्तम रामाजी भोयर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला २००५ साली गडचिरोली सत्र न्यायालयाने (कलम ३०२, २०१ भा.द.वि.) अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नागपूरच्या खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असताना १५ जून २०१५ रोजी तो सुरक्षा रक्षकांना चकवा देत फरार झाला होता. याप्रकरणी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता.
फरार झाल्यानंतर आरोपीने आपली खरी ओळख लपवून गडचिरोलीतील एका युवतीशी विवाह केला आणि चंद्रपूर येथे वास्तव्यास होता. मात्र, त्याच्या आक्रमक स्वभावामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. अखेर पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नी माहेरी परतली तरीही आरोपीने तिचा पिच्छा सोडला नाही.
१९ मार्च २०२६ रोजी पत्नीने गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा क्र. १४१/२०२६ नोंदवून तपास सुरू केला. पोलीस हवालदार विशाल केदार यांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याची खरी ओळख उघड झाली आणि तो नागपूर कारागृहातून फरार असलेला ‘शिक्षाबंदी’ असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर नागपूर मध्यवर्ती कारागृहाशी संपर्क साधून माहितीची खातरजमा करण्यात आली. खात्री पटताच आरोपी पुरुषोत्तम भोयर याला पुन्हा कारागृहात दाखल करण्यात आले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. एका साध्या घरगुती तक्रारीतून ११ वर्षांपासून फरार असलेला खुनी जेरबंद झाल्याने गडचिरोली पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.