Home Breaking News लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक ; दुचाकीस्वार गंभीर जखमी

433

• कुनघाडा रै बसथांब्यावर अपघातांची मालिका कायम, सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी तीव्र

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २३ : गडचिरोली–चामोर्शी मार्गावरील कुनघाडा रै बसथांबा परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघात घडला असून, लोहखनिज वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. रविवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, सीजी ०४ एमक्यू ९५७४ क्रमांकाचा लोहखनिज वाहतूक करणारा ट्रक गडचिरोलीवरून चामोर्शीकडे जात होता. त्याचवेळी एमएच ३३ यू ६००४ क्रमांकाची सुझुकी दुचाकी घेऊन नितीन उद्धव खोब्रागडे (वय ४५) हे कुनघाडा रै येथून गडचिरोलीकडे निघाले होते. बसथांबा परिसरात पोहोचताच, दुचाकीस्वार डाव्या बाजूने जात असतानाच भरधाव ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
या अपघातात खोब्रागडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी दाखल झालेल्या फिरत्या पोलिस पथकाने त्यांना तातडीने चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

दरम्यान, कुनघाडा रै बसथांबा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. जानेवारी महिन्यातील एका अपघातात अतुल तुळशीराम कोसमशिल्ले यांचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी २ जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन केले होते. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

या धोकादायक ठिकाणी तातडीने बॅरिकेड्स उभारावेत, वेगमर्यादा नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात तसेच पोलिस बंदोबस्त कायमस्वरूपी तैनात करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.

Don`t copy text!