• जंगलातून मोठा शस्त्रसाठा जप्त, इन्सास रायफलसह स्फोटकांचा मोठा साठा नष्ट
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ :- गडचिरोली जिल्ह्यात माओवादी चळवळीला मोठा हादरा देणारी कारवाई करत गडचिरोली पोलीस व नारायणपूर (छत्तीसगड) पोलिसांनी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती जंगल परिसरातील माओवाद्यांचा गुप्त शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त केला आहे. या धडक कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा, स्फोटके व शस्त्रनिर्मितीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले असून घटनास्थळीच ते नष्ट करण्यात आले.
विशेष म्हणजे, गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलेल्या माजी माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही संयुक्त आंतरराज्यीय मोहीम राबविण्यात आली. माओवाद्यांकडून दुर्गम जंगल परिसरात शस्त्रे, आयईडी स्फोटके व इतर घातक साहित्य तयार करून जमिनीत लपवून ठेवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच साहित्याचा वापर नक्षल सप्ताह, निवडणुका व सुरक्षा दलांवरील घातपातासाठी केला जात असल्याचेही तपासात उघड झाले आहे.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली 26 मे 2026 रोजी विशेष अभियान पथक प्राणहिता, बीडीडीएस प्राणहिता व डीआरजी नारायणपूर यांच्या संयुक्त पथकांनी पोस्टे काकूर, जि. नारायणपूर (छ.ग.) पासून सुमारे 7 किमी अंतरावरील जंगल परिसरात शोधमोहीम सुरू केली. 27 मे रोजी जंगल परिसराची कसून तपासणी करण्यात आली असता माओवाद्यांनी लपवून ठेवलेला मोठा शस्त्रसाठा उघडकीस आला.
या कारवाईत 01 इन्सास रायफल, 02 सिंगल शॉट रायफल, 02 बारा बोअर रायफल, एकूण 18 जिवंत काडतुसे, 25 किलो आयईडी स्फोटक, 02 क्लेमोर, 110 डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर, 500 पेक्षा अधिक बीजीएल सेल, 07 बीजीएल लाँचर, 03 ट्यूब लाँचर, तसेच शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे 02 लेथ मशीन, मोटर्स, ग्राइंडर मशीन, इन्व्हर्टर, बॅटरी, सोलर प्लेट, वायर बंडल आदी साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी घटनास्थळीच माओवादी शस्त्रनिर्मिती साहित्य नष्ट करून माओवाद्यांच्या घातपाती कारवायांना मोठा प्रतिबंध घातल्याचे सांगितले आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे., पोलीस उपअधीक्षक (अभियान) विशाल नागरगोजे व पोलीस उपअधीक्षक नारायणपूर मनोज मंडावी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी मोहिमेत सहभागी जवानांचे पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.














