Home Breaking News गडचिरोलीत रुग्णवाहिकेला पेट्रोल नाकारले : रुग्ण जीवावर बेतला डोंगरे पेट्रोल पंपावर कारवाईची...

गडचिरोलीत रुग्णवाहिकेला पेट्रोल नाकारले : रुग्ण जीवावर बेतला डोंगरे पेट्रोल पंपावर कारवाईची मागणी

1230

गडचिरोलीत रुग्णवाहिकेला पेट्रोल नाकारले : रुग्ण जीवावर बेतला डोंगरे पेट्रोल पंपावर कारवाईची मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.२५ : आपत्कालीन परिस्थितीतही रुग्णवाहिकेला पेट्रोल देण्यास नकार दिल्याची संतापजनक घटना शहरातील बजाज शोरूम परिसरात उघडकीस आली असूनगडचिरोलीत , यामुळे एका रुग्णाचा जीव धोक्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी संबंधित डोंगरे पेट्रोल पंपावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शिवसेना संघटनेने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान वार्डातील रहिवासी दिलीप येरमे यांची अचानक प्रकृती बिघडून ते बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेत असताना बजाज शोरूमजवळ रुग्णवाहिकेचे पेट्रोल संपले आणि गाडी बंद पडली. जीवघेण्या परिस्थितीत बादल मडावी व गोपाल भारसाकडे यांनी जवळील डोंगरे पेट्रोल पंपावर बाटली घेऊन धाव घेतली.
मात्र, पंपावरील व्यवस्थापकाला संपूर्ण परिस्थिती समजावून सांगूनही पेट्रोल देण्यास स्पष्ट नकार देण्यात आला. “इन्स्पेक्शनवाल्यांशी बोला” असे सांगत संबंधितांना तेथून परत पाठविण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त होत असून, आपत्कालीन सेवेलाही नकार देणे कितपत योग्य, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, परिस्थितीची गंभीरता ओळखून दीपक रमेश भारसाकडे यांनी स्वतःच्या वाहनातून संबंधित रुग्णाला सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सुदैवाने पुढील उपचार वेळेत मिळाल्याने मोठा अनर्थ टळला.
या घटनेनंतर शिवसेना युवा सेनेचे जिल्हा प्रमुख दीपक रमेश भारसाकडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून संबंधित पेट्रोल पंपावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “आपत्कालीन परिस्थितीतही सामान्य नागरिकांना अशी वागणूक मिळत असेल, तर ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने याची दखल घेणे आवश्यक आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने तात्काळ चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान याबाबत पेट्रोल पंप संचालकाशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Don`t copy text!