Home Breaking News रुग्णवाहिकेतून दारू तस्करीचा भंडाफोड ; सायरनचा गैरवापर करून पोलिसांना चकवा

रुग्णवाहिकेतून दारू तस्करीचा भंडाफोड ; सायरनचा गैरवापर करून पोलिसांना चकवा

501

रुग्णवाहिकेतून दारू तस्करीचा भंडाफोड ; सायरनचा गैरवापर करून पोलिसांना चकवा

लोकवृत्त न्यूज
आष्टी : रुग्णसेवेसाठी असलेल्या रुग्णवाहिकेचा वापर करून दारू तस्करी करणाऱ्या धक्कादायक रॅकेटचा आष्टी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. सायरन आणि निळ्या दिव्याचा गैरवापर करून पोलिसांना चकवा देत ही तस्करी सुरू असल्याचे उघड झाले असून, या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गुप्त माहितीनुसार आष्टी पोलीस ठाण्याचे ठाणेदार विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी महात्मा फुले महाविद्यालय परिसरात सापळा रचला. यावेळी सायरन वाजवत वेगाने येणाऱ्या रुग्णवाहिकेला अडवून तपासणी केली असता, आत एकही रुग्ण नसून मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी दारूच्या पेट्या आढळून आल्या. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
पोलिसांनी रुग्णवाहिकेसह तब्बल ८ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सुल्तान मोहम्मद शेख आणि सौरभ चंदू गायकवाड (दोघेही रा. चंद्रपूर) यांना अटक करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये निळ्या पन्नीतील देशी दारू तसेच ‘रॉयल स्टॅग (RS)’ ब्रँडची विदेशी दारू आढळून आली आहे. प्राथमिक तपासात ही दारू बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, रुग्णवाहिकेवर सायरन आणि निळा दिवा असल्यामुळे अशा वाहनांना सहसा अडवले जात नाही, याचाच फायदा घेत हा बेकायदेशीर गोरखधंदा सुरू होता. मात्र, आष्टी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे या तस्करीला मोठा आळा बसला आहे.

Don`t copy text!