• ‘माणुसकीचा एक घास’ उपक्रमातून अन्नदान
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ३१ :- गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त स्थानिक जिल्हा महिला रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी ‘माणुसकीचा एक घास’ या उपक्रमांतर्गत अन्नदान करण्यात आले.
भारतीय जनता पार्टी, गडचिरोली जिल्हा यांच्या वतीने केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
वाढदिवसानिमित्त माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसगडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघारे, नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्वांनी डॉ. उसेंडी यांना शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमादरम्यान स्नेहसंमेलनाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित कार्यकर्त्यांनी एकत्र येत आपुलकीने शुभेच्छांचा वर्षाव केला.
एकूणच, सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आलेला हा वाढदिवस कार्यक्रम उत्साह, आनंद आणि सेवाभावाचे प्रतीक ठरला.











