गडचिरोलीत SRPF प्रक्रियेदरम्यान तरुणाचा मृत्यू, पोलीस होण्याचे स्वप्न चिरडले
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. ६ एप्रिल :- वडसा येथील SRPF भरती प्रक्रियेदरम्यान एका उमेदवाराचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. आशिष म्हशाखेत्री (रा. देलोडा, ता. आरमोरी, जि. गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे.
विसोरा येथील एसआरपीएफ कॅम्प परिसरात सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत आशिष उत्साहाने सहभागी झाला होता. पोलीस दलात दाखल होऊन कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द बाळगून तो मैदानात उतरला होता. मात्र, भरतीदरम्यान अचानक त्याला अस्वस्थता जाणवू लागली आणि काही क्षणांतच तो कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
आशिषने यापूर्वीही गडचिरोली पोलीस भरतीत प्रयत्न केले होते. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर पोलीस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या तरुणाचा अंत इतक्या दुर्दैवी पद्धतीने झाल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
या घटनेने केवळ एका कुटुंबाचा आधार हिरावला नाही, तर भरती प्रक्रियेतील आरोग्य सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिसरात हळहळ व्यक्त होत असून, “भरतीसाठी धावला… पण परतलाच नाही,” अशी वेदनादायक भावना नागरिक व्यक्त करत आहेत.














