योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा : डॉ. नामदेव उसेंडी
लोकवृत्त न्यूज
सिरोंचा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान २०२६’ अंतर्गत सिरोंचा येथील क्रीडा संकुलात दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात पार पडली. ७ ते ८ एप्रिलदरम्यान आयोजित या कार्यशाळेत भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वैचारिक आणि संघटनात्मक बळकटी देण्यावर विशेष भर देण्यात आला.
कार्यशाळेत माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी मार्गदर्शन करताना, “सरकारच्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हीच खरी सेवा आहे,” असे ठामपणे सांगितले. कार्यकर्त्यांनी जनतेशी थेट संपर्क ठेवून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यशाळेत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानववाद’ आणि ‘अंत्योदय’ या विचारधारेवर विशेष चर्चा करण्यात आली. सेवा, समर्पण आणि राष्ट्रहित या मूल्यांवर आधारित कार्यपद्धती अधिक दृढ करण्यावर भर देण्यात आला.
माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव महाराज आत्राम यांनी पक्षाचा इतिहास, विचारधारा आणि संघटनात्मक कार्यपद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मूलभूत तत्त्वांवर ठाम राहून जनसेवेला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. किसान मोर्चाचे प्रदेश सचिव रमेश भुरसे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या आणि शासनाच्या योजनांवर मार्गदर्शन करत कार्यकर्त्यांना शेतकरी हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यशाळेत भाजपचा इतिहास, वैचारिक अधिष्ठान, कार्यविस्तार, बूथ व्यवस्थापन, तसेच सरकारच्या योजनांची अंमलबजावणी यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. या प्रशिक्षणामुळे कार्यकर्त्यांचे नेतृत्व कौशल्य, संघटन क्षमता आणि सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास राजे अंब्रिशराव आत्राम, रमेश भुरसे, अवधेशबाबा आत्राम, प्रकाश गेडाम, सत्यम मनचर्लावर, श्रीनाथ राऊत, शंकर नरहरी, दामोधर अरगेला, डॉ. श्रीकांत सुगरवार, संतोष पडाला, किरणताई कुलसंगे, शरीख शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











