• कोटपा कायद्यांतर्गत ७ जणांवर दंडात्मक कारवाई
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- आगामी ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली परिसरात तंबाखूविरोधी विशेष धडक कारवाई मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत कोटपा (COTPA) कायदा २००३ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
मोहीमेदरम्यान दोन कर्मचाऱ्यांवर कोटपा कायदा २००३ च्या कलम ४ नुसार कारवाई करून ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच रुग्णालय परिसरातील १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या पानठेला चालकांवर आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
या संयुक्त मोहिमेत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री आणि कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या एकूण ५ जणांवर कारवाई करून सुमारे १ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
ही मोहीम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लाहाडे आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईदरम्यान संबंधित नागरिक, विक्रेते आणि युवकांना तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आरोग्य दुष्परिणाम, कर्करोगासारखे जीवघेणे आजार तसेच तंबाखू नियंत्रण कायद्याचे महत्त्व याविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.
“तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता चिंतेची बाब असून आगामी काळात अशा संयुक्त मोहिमा अधिक व्यापक आणि प्रभावी स्वरूपात राबविण्यात येतील,” असे जिल्हा सल्लागार डॉ. प्रेरणा राऊत यांनी सांगितले.
या मोहिमेत डॉ. प्रेरणा राऊत (जिल्हा सल्लागार), मिना दिवटे (सामाजिक कार्यकर्त्या) तसेच भूपेश डरदमारे यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी प्रशासनाने उचललेले हे पाऊल जनजागृतीसह कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानले जात आहे.














