मका पिकाला लागलेली आग विझविताना शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू; सोनापूर गावावर शोककळा
लोकवृत्त न्यूज
सोनापूर, दि. 20 मे : सावली तालुक्यातील सोनापूर गावात बुधवारी दुपारच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी घटना घडली. मक्याच्या शेताला लागलेली आग विझविण्याच्या प्रयत्नात शेतकरी साईनाथ नामदेव उडान (वय 42 वर्षे) यांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात सध्या शेतातील काडी-कचरा जाळण्याचे काम सुरू असून, सोनापूर शेतशिवारातील एका शेतात लागलेली आग जोरदार वाऱ्यामुळे पसरत जाऊन साईनाथ उडान यांच्या मका काढून ठेवलेल्या शेतापर्यंत पोहोचली. काही क्षणांतच शेतातील सुकलेल्या अवशेषांनी पेट घेतल्याने आगीने रौद्ररूप धारण केले.
डोळ्यांसमोर मेहनतीने उभे केलेले पीक जळताना पाहून साईनाथ उडान यांनी स्वतःच आग विझविण्यासाठी धाव घेतली. मात्र दुपारचे कडक ऊन, वाढती आग आणि धग यामुळे परिस्थिती गंभीर बनली. आग आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नात त्यांना आगीचे तसेच उन्हाचे तीव्र चटके बसल्याने त्यांची प्रकृती अचानक खालावली.
घटनेनंतर कुटुंबीय आणि ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे हलविण्याचा प्रयत्न केला. मात्र उपचारासाठी नेत असतानाच वाटेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेमुळे उडान कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. साईनाथ उडान हे मेहनती, शांत स्वभावाचे आणि कष्टाळू शेतकरी म्हणून परिसरात परिचित होते. त्यांच्या निधनामुळे गावाने एक कर्तबगार शेतकरी गमावल्याची भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, या घटनेनंतर शेतातील काडी-कचरा जाळताना आवश्यक खबरदारी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि वाऱ्याचा वेग यामुळे आग काही क्षणांत मोठ्या दुर्घटनेचे रूप धारण करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.














