सावली : नवीन घराच्या चिंतेतून युवकाची आत्महत्या
लोकवृत्त न्यूज
सावली, : सावली तालुक्यातील पालेबारसा येथील एका २५ वर्षीय युवकाने स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
मृत युवकाचे नाव सोमेश्वर देवाजी हजारे (वय २५, रा. पालेबारसा) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे जुने घर मोडकळीस आल्याने ते नवीन घर बांधण्याच्या तयारीत होते. मात्र पावसाळा सुरू होऊनही घराचे बांधकाम पूर्ण न झाल्याने ते काही दिवसांपासून शेजाऱ्याच्या घरी वास्तव्यास होते. घराच्या कामाबाबत निर्माण झालेली चिंता आणि मानसिक तणाव यामुळे ते नैराश्यात गेले असल्याची चर्चा गावात आहे.
रविवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास सोमेश्वर यांनी स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच पाथरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितेश डोरलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे तसेच पोलीस कर्मचारी यशवंत कोशमशिले, सतीश गुरनुले, लक्ष्मीकांत खंडाळे, बळीराम बारेकर आणि दत्तराव शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, युवकाच्या अकाली निधनामुळे पालेबारसा गावासह परिसरात शोककळा पसरली असून हजारे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.














