राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी समाजाची जिल्हास्तरीय बैठक संपन्न
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. १५ : आदिवासी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गडचिरोली येथे जिल्हास्तरीय सामाजिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. गडचिरोलीचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला नवनियुक्त राज्यसभा खासदार मायाताई इवनाते यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती लाभली. ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
बैठकीच्या प्रारंभी राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मायाताई इवनाते यांचा आदिवासी समाजाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. त्यानंतर आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासाशी निगडित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत आदिवासी समाजासमोरील शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक आव्हाने, रोजगाराच्या संधी, वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, युवक-युवतींसाठी कौशल्य विकास कार्यक्रम, दुर्गम भागातील आरोग्य व शिक्षण सुविधा, तसेच मूलभूत पायाभूत सुविधांच्या उभारणीसंदर्भात विस्तृत विचारमंथन करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी बदलत्या सामाजिक परिस्थितीत आदिवासी संस्कृती, परंपरा आणि ओळख जपत समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटित प्रयत्न करण्याचा निर्धारही बैठकीत व्यक्त करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात खासदार मायाताई इवनाते यांनी आदिवासी समाजाच्या अपेक्षा, समस्या आणि मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या. या सर्व बाबी संसदेच्या माध्यमातून शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून समाजाच्या हक्क, विकास आणि सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनीही आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांबाबत आपली भूमिका स्पष्ट करत समाजाशी सातत्यपूर्ण संवाद राखून त्यांच्या मागण्या शासन दरबारी प्रभावीपणे मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. देवाजी तोफा, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माधव गावळ, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदू नरोटे यांच्यासह विविध आदिवासी संघटनांचे पदाधिकारी, ग्रामसभा प्रतिनिधी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे, या बैठकीत जिल्ह्यातील २२ आदिवासी संघटना आणि विविध ग्रामसभांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यामुळे ही बैठक आदिवासी समाजाच्या एकजुटीचे, सामाजिक ऐक्याचे आणि समाजहिताच्या प्रश्नांवर सामूहिकपणे मार्ग शोधण्याच्या सकारात्मक भूमिकेचे प्रतीक ठरली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी केले. संचालन अमरसिंग गेडाम यांनी केले तर आभार श्रीमती पुष्पलता कुमरे यांनी मानले.











