देसाईगंज : चिमुकल्यांना केली बेदम मारहाण ; व्हिडिओ व्हायरल

1148

– कबूतर चोरल्याचा संशय

लोकवृत्त न्यूज
देसाईगंज ६ ऑगस्ट : कबूतर चोरल्याचा संशयातून तीन चिमुकल्या बालकांना बेदम मारहाण केल्याची घटना देसाईगंज तालुक्यातील आमगाव येथे आठ दिवसांपूर्वी घडली. या घटनेबाबतचा व्हिडिओ सोमवार ५ ऑगस्ट रोजी समाज माध्यमांवर व्हायरल होतात हे प्रकरण उघडकीस आल्याने देसाईगंज शहरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.
आरोपी हा देसाईगंज शहरात वास्तव्यास असून त्याचे आमगाव येथे घरबांधकाम सुरू होते. दरम्यान आमगाव येथील बांधकाम होत असलेल्या ठिकाणचे कबूतर चिमुकल्यांनी चोरले असा संशय व्यक्त करत तीन निरागस चिमुकल्यांना आरोपीने बेदम मारहाण केली. याबाबतचा व्हिडिओही सोमवारला समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओ पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी रात्रीच आरोपीचे घर गाठले, दरम्यान स्थानिक पोलीस आरोपीच्या घरी आल्याने मोठा अनर्थ टळला. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील कारवाई देसाईगंज पोलीस करीत आहे.