– धानोऱ्यातील रस्त्याच्या हलगर्जीपणाची बलि
लोकवृत्त न्यूज
धानोरा, दि. ७ मे :– धानोरा शहरात मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयाला चटका लावणारी घटना घडली. स्टेट बँकेसमोर रुग्णवाहिकेला रस्ता देताना दुचाकी घसरून एका २८ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला.
मृत युवकाचे नाव भगचंद माणिक लिलारे असून, ते मूळचे पठारी (ता. किर्णापूर, जि. बालाघाट, छत्तीसगड) येथील रहिवासी आहेत. ते धानोरा येथील बांबू डेपोमध्ये दिवाणजी म्हणून काम करत होते.
मंगळवारी भगचंद लिलारे एमएच ४९ बीवाय ३१०६ या क्रमांकाच्या दुचाकीवरून डेपोमधून खोलीकडे जात असताना मुरूमगावाकडून येणाऱ्या रुग्णवाहिकेला वाट देताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. महामार्गालगत सुरू असलेल्या रस्त्याच्या खोदकामामुळे गिट्टी सैल झालेली असल्याने दुचाकी घसरली आणि ते थेट दगडावर आदळले. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
जवळच उपस्थित नागरिकांनी तातडीने त्यांना ग्रामीण रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. भगचंद आपल्या वडिलांसोबत धानोरा येथे वास्तव्यास होते. त्यांच्या मागे पत्नी, वडील आणि केवळ दीड वर्षांची मुलगी असा परिवार असून, त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून, महामार्गावर सुरू असलेल्या असुरक्षित कामामुळेच हा निष्पाप जीव गमवावा लागला, असा नागरिकांचा आरोप आहे. संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी नागरिक करत आहेत.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #accident )

