ग्रामीण मुलांसाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचे परिवर्तनात्मक उन्हाळी शिबिर यशस्वी

44

ग्रामीण मुलांसाठी लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचे परिवर्तनात्मक उन्हाळी शिबिर यशस्वी

लोकवृत्त न्यूज
हेडरी, १९ मे :- सामाजिक सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन (LIF) ने गडचिरोली जिल्ह्यातील हेडरी येथील लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीत ८ ते १८ मे या कालावधीत दहा दिवसीय उन्हाळी शिबिराचे यशस्वी आयोजन केले. एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम गावांमधून आलेल्या विद्यार्थ्यांसह दररोज ५०० हून अधिक मुलांनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. ६ ते १६ वयोगटातील मुलांना शारीरिक प्रशिक्षण, सर्जनशील शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत ऍथलेटिक्स, धनुर्विद्या, फुटबॉल, व्हॉलीबॉल, कबड्डी, क्रिकेट, नृत्य, हस्तकला, चित्रकला यांसारख्या विविध स्पर्धात्मक व सर्जनशील उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांची कौशल्ये विकसित करण्यात आली. याशिवाय पर्यावरण जागरूकता, सुरक्षा प्रशिक्षण, रोजगार मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास यावर आधारित सत्रांमधून मुलांमध्ये आत्मविश्वास, जागरूकता आणि भविष्यासाठी दिशा निर्माण झाली. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संवाद सत्रात विद्यार्थ्यांना पोलिस खात्यातील करिअर संधी, पोलीस भरती आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षांसंबंधी मार्गदर्शन मिळाले. लॉयड्स मेटल्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील विविध क्षेत्रांतील करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.

दुर्गम भागातील ९० मुलांसाठी LIF ने प्रवास, निवास व पौष्टिक आहाराची मोफत व्यवस्था केली होती. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना क्रीडा पोशाख प्रदान करण्यात आले, ज्यातून सांघिक एकतेचा अनुभव मिळाला. शिबिराच्या समारोप समारंभात स्थानिक ग्रामस्थ, पालक, लोकप्रतिनिधी, पोलिस अधिकारी आणि लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड, लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशन आणि लॉयड्स इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन लिमिटेडचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी आणि कलाकृतींच्या प्रदर्शनाने उपस्थितांचे मन जिंकले. विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत ४७२ मुलांना २.३५ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीची बक्षिसे आणि प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या प्रसंगी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व LIF चे संचालक बी. प्रभाकरन म्हणाले, “हे शिबिर केवळ निखळ आनंद आणि खेळांबाबत नव्हते, तर ते स्वप्न, आत्मविश्वास आणि उज्ज्वल भविष्यासाठी मजबूत पाया घालणारे ठरले.” मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, पालकांचा अभिमान आणि उपस्थित जनतेच्या टाळ्यांचा कडकडाट या शिबिराच्या जबरदस्त यशाची साक्ष देत होते. उन्हाळी शिबिर २०२५ हे नुसतेच संस्मरणीय नव्हते, तर ग्रामीण मुलांच्या मनात नवी स्वप्ने रोवणारा आणि त्यांच्या भविष्यासाठी आशेचा किरण ठरलेला एक परिवर्तनात्मक अनुभव ठरला.

 

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #GADCHIROLI POLICE #Maharashtra #Surjagarh #Lloyds Infinit Foundation )