गडचिरोली ५ जहाल माओवादी हत्यारांसह जेरबंद

997

गडचिरोली ५ जहाल माओवादी हत्यारांसह जेरबंद

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि, २० मे:- जिल्ह्यात घातपाताची तयारी करत असलेल्या पाच जहाल माओवादींचा कट स्थानिक पोलिस आणि सीआरपीएफने वेळीच उधळून लावला असून, त्यांना हत्यारांसह ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत दोन महिला माओवादींसह पाच जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा व वॉकीटॉकी संच जप्त करण्यात आले आहेत. अटकेत आलेल्या पाचही माओवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ३६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

ही धडक कारवाई भामरागड उपविभागातील लाहेरी पोलिस उपपोस्टेच्या हद्दीतील बिनागुंडा जंगल परिसरात १९ मे रोजी सकाळच्या सुमारास करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सुमारे ५०-६० माओवादी त्या परिसरात घातपाताच्या उद्देशाने गोळा झाले होते. त्यावरून पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सि-60 दलाच्या आठ पथकांसह सीआरपीएफच्या ३७ बटालियनची ‘ए’ कंपनीने संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली.

शिताफीने घेराव घालून सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान गावात सामान्य नागरिक असल्याने गोळीबार टाळण्यात आला आणि पाच माओवादी हत्यारांसह जिवंत ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून एक एसएलआर, एक .303 रायफल, तीन सिंगल शॉट रायफल्स, दोन भरमार बंदुका आणि तीन वॉकीटॉकी संच जप्त करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये उंगी मंगरु होयाम ऊर्फ सुमली (डीव्हीसीएम), पल्लवी केसा मिडीयम ऊर्फ बंडी (पीपीसीएम), देवे कोसा पोडीयाम ऊर्फ सबिता (सदस्य) यांचा समावेश असून, उर्वरित दोन प्लाटून सदस्यांमध्ये अल्पवयीन असल्याची शक्यता असून, त्यांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार आहे. तिघांवर अनुक्रमे १६, ८ आणि ४ लाखांचे बक्षीस जाहीर होते, तर दोघांवर मिळून ८ लाखांचे बक्षीस होते.

या कारवाईदरम्यान काही माओवादी जंगलाचा फायदा घेत पळून जाण्यात यशस्वी ठरले. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी नक्षलविरोधी मोहिमा आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून, माओवादींनी आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

ही यशस्वी कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय शर्मा आणि पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली सि-60 दल व सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने पार पाडली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत १०३ माओवादींना अटक करण्यात गडचिरोली पोलिस दलाला यश आले आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews @GADCHIROLI POLICE #Maharashtra #naxal )