अबूझमाडमध्ये सुरक्षा दलांचा मोठा विजय : २७ नक्षली ठार, इनामी बसवा राजूचा अंत

487

– एक जवान शहीद; नक्षल चळवळीच्या कडव्या नेतृत्वाला जबर धक्का

लोकवृत्त न्यूज
नारायणपूर, २१ मे : छत्तीसगडमधील अतिदुर्गम अबूझमाडच्या जंगलात बुधवारी सकाळी सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्यांमध्ये नक्षल चळवळीचा कुख्यात सरचिटणीस बसवा राजू याचा समावेश असून त्याच्यावर १.५ कोटींचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
ही कारवाई DRG, STF आणि CRPF यांच्या संयुक्त ऑपरेशनचा भाग होती. बोटेर गावाजवळ ही चकमक घडली. विशेष गुप्त माहितीच्या आधारे सुरू करण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनदरम्यान नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनी जोरदार कारवाई करत नक्षल गटाचे मनसुबे उधळून लावले.
या संघर्षात एक जवान शहीद झाला असून अनेक जवान जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत.
सुमारे तीन तास चाललेल्या या कारवाईत शस्त्रास्त्रे, स्फोटके, वायरलेस सेट्स, नकाशे आणि इतर सामग्री मोठ्या प्रमाणात हस्तगत करण्यात आली. ठार झालेल्यांमध्ये नक्षल चळवळीतील अनेक वरिष्ठ कमांडर्स असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले असून, या मोहिमेमुळे नक्षल चळवळीच्या गोटात मोठा धक्का बसला आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews @GADCHIROLI POLICE #Maharashtra #naxal )