Home Breaking News भरधाव ट्रकने चिरडले : महिला जागीच ठार

भरधाव ट्रकने चिरडले : महिला जागीच ठार

431

भरधाव ट्रकने चिरडले : महिला जागीच ठार

लोकवृत्त न्यूज
कोरची–कुरखेडा राष्ट्रीय महामार्गावरील बेफाम वाहनचालकांच्या मोकाटपणामुळे आज पुन्हा एकदा जीवघेणा अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वार दाम्पत्याला चिरडल्याने रेवताबाई उसेंडी (६०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजाराम उसेंडी (६६) गंभीर जखमी झाले आहेत.

ही घटना आज सकाळी सुमार १० वाजता, कोरचीपासून आठ किलोमीटर अंतरावर, बेडगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत घडली. झगडवाही येथे नातेवाईकांची प्रकृती बघण्यासाठी जामटोला येथून निघालेले दाम्पत्य MH 33 L 6425 क्रमांकाच्या दुचाकीवरून प्रवास करत असताना, विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. धडकेनंतर रेवताबाई यांचा जागीच मृत्यू झाला, तर राजाराम यांचा पाय तुटून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. घटनास्थळावरील टायरचे ठसे आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते, ट्रक चुकीच्या दिशेने आणि अतिवेगात होता. या रस्त्यावरील खड्डे, अरुंद रस्ता आणि साईड बंप्सचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

जखमी राजाराम उसेंडी यांना तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे हलविण्यात आले. १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी उपलब्ध नसल्यामुळे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ढाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन खासगी वाहनाने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.

या मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असून, सुरजागड खाणीतील ट्रक चालकांचा बेदरकार वेग व वाहतूक नियंत्रणाचा अभाव हे मुख्य कारण असल्याचे स्पष्ट होते. या अपघातामुळे पुन्हा एकदा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांनी या मार्गावर त्वरीत उपाययोजना करण्याची जोरदार मागणी केली आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews @GADCHIROLI POLICE #Maharashtra #surjagarh #accident )

Don`t copy text!