Home Breaking News सावलीत : दोन दिवसांत “मायलेकी”सह चार वाघ जेरबंद

सावलीत : दोन दिवसांत “मायलेकी”सह चार वाघ जेरबंद

394

जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी बचाव मोहीम

लोकवृत्त न्यूज
सावली : सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड खुर्द उपवनपरिक्षेत्रांतर्गत उपरी बीटातील गव्हारला परिसरात अनेक दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या एका वाघिणीसह तिच्या तीन बछड्यांना अखेर वनविभागाने दोन दिवसांच्या थरारक मोहिमेनंतर सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. ही कारवाई चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी आणि यशस्वी मोहीम ठरली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात वाघिणीसह तीन बछडे वारंवार शेतशिवारात दिसत होते. गुरांवर हल्ले होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोणतीही मानवहानी होऊ नये यासाठी वनविभागाने तातडीने विशेष मोहीम राबविली.
९ नोव्हेंबर रोजी डोनाळा परिसरात बचाव शिबिर उभारून रेस्क्यू मोहीम सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी दोन बछड्यांना (एक मादी व एक नर) पकडण्यात यश आले. मात्र, वाघिणी आणि उरलेला एक बछडा शोधण्यात अडचणी येत होत्या. वनकर्मचारी, तज्ज्ञ डॉक्टर आणि शूटर यांच्या सहाय्याने ही मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्यात आली.
१० नोव्हेंबर रोजी आणखी एक मादी बछडा जेरबंद करण्यात यश आले. मात्र आपल्या पिलांसाठी आसुसलेली ‘TF4’ नावाने ओळखली जाणारी वाघीण या मोहिमेत बराच वेळ वनकर्मचाऱ्यांना चकवत होती. अखेर कसोशीच्या प्रयत्नांनंतर वनविभागाच्या पथकाने वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळवले.
दोन दिवसांच्या सलग प्रयत्नांतून एकूण चार वाघ — एक वाघीण आणि तिचे तीन बछडे — सुरक्षितरीत्या जेरबंद करण्यात आले आहेत. पकडलेल्या सर्व वाघांना उपचार व काळजीसाठी TTC चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.
ही मोहीम सहाय्यक वनसंरक्षक विकास तरसे व वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे (सावली) यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. मोहिमेत शूटर शघनश्याम नायगमकर, डॉ. कुंदन पोडचेलवार (पशुधन विकास अधिकारी, TTC चंद्रपूर), जीवशास्त्रज्ञ अक्षय नारनवरे, RRU टीम, तसेच वनरक्षक व क्षेत्र सहाय्यक यांच्या चमूंनी मोलाचे योगदान दिले.
संपूर्ण मोहिमेचे मार्गदर्शन विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांनी केले.

#वनविभाग #lokvruttnews @lokvrutt.com #ChandrapurForest #TigerRescue #SawaliOperation #WildlifeConservation

Don`t copy text!