“मामा”च्या आमिषाला भाच्याचा विश्वास महागात ; ६.५ लाखांची फसवणूक

312

“मामा”च्या आमिषाला भाच्याचा विश्वास महागात ; ६.५ लाखांची फसवणूक
– मूल पोलिसांकडे तक्रार

लोकवृत्त न्यूज
मूल (ता. १६ जून) :- चुलत मामाच्या तोंडी शासकीय नोकरीचं आमिष ऐकून विश्वास ठेवणाऱ्या भाच्याला तब्बल ६.५ लाखांचा फटका बसला आहे. “मामा”नेच संगनमताने बनवेगिरी केली आणि भाच्याला फसवले. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरातील हा प्रकार उघडकीस आला असून, पीडिताने मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
राहुल रामदास महाजनवार (वय ४०) असे तक्रारदाराचे नाव असून, ते मूल पंचायत समितीत कंत्राटी वाहन चालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे चुलत मामा राजेश ऊर्फ राजू पुदटवार यांनी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीचे आमिष दाखवून शासकीय नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यांच्यासोबत नाना अक्केवार या व्यक्तीचाही यात सहभाग होता. २४ एप्रिल २०२५ रोजी राहुल यांनी ६.५ लाख रुपये रोख स्वरूपात दिले. मात्र त्यानंतर केवळ खोट्या आश्वासनांचा पाढा आणि वेळकाढूपणा सुरू झाला.
पैसे दिल्यानंतर काही दिवस माहिती देत राहिल्यानंतर दोघांनी टाळाटाळ सुरू केली. पैसे परत मागितल्यावर उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अखेर राहुल यांनी १४ जून रोजी मूल पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, दोघांनी संगनमत करून खोटी माहिती दिली, शासकीय नोकरी मिळवून देण्याचे भासवत रक्कम घेतली आणि फसवणूक केली.
या प्रकरणातील गंभीर बाब म्हणजे, “मामा” या नात्याने केलेला विश्वासघात. नातेसंबंधावरचा विश्वास डळमळीत करणारा आणि सामाजिक पातळीवर चिंता निर्माण करणारा हा प्रकार आहे. विशेष म्हणजे, आरोपींकडून पैसे घेतानाचे व्हिडिओ सार्वजनिक झाल्याने प्रकरण चांगलेच गाजू लागले आहे. अनेकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे.
“मी मेहनतीने कमावलेले पैसे त्यांच्या हाती दिले. फसवणूक झाली. इतर कोणी अशा जाळ्यात अडकू नये, म्हणूनच मी तक्रार दिली,” असे राहुल महाजनवार यांनी स्पष्ट केले.
या फसवणूक प्रकरणाचा तपास सुरू असून दोषींवर कायदेशीर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #crime @Chandrapur police )