Home Breaking News केरोडा ग्रामपंचायतीला संतप्त ग्रामस्थांचे कुलूप; विकासकामांवरील नाराजीचा उद्रेक

केरोडा ग्रामपंचायतीला संतप्त ग्रामस्थांचे कुलूप; विकासकामांवरील नाराजीचा उद्रेक

448

• सरपंच, उपसरपंच आणि सचिव ग्रामसभेला गैरहजर ; निधी वापराबाबत ग्रामस्थांचे गंभीर आरोप

लोकवृत्त न्यूज
सावली : तालुक्यातील केरोडा ग्रामपंचायतीच्या कथित भोंगळ कारभाराविरोधात संतप्त ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयालाच कुलूप ठोकत तीव्र निषेध नोंदविला. ग्रामसभांकडे होत असलेले दुर्लक्ष, विकासकामांबाबतची उदासीनता आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सुमारे २२०० लोकसंख्या असलेल्या केरोडा गावात विविध शासकीय योजनांमधून ग्रामविकासासाठी निधी उपलब्ध होत असतानाही त्या निधीचा योग्य वापर होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, दिवाबत्ती यांसारख्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावातील विकासकामे आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बोलावण्यात येणाऱ्या ग्रामसभांना सरपंच, नर्मदा प्रकाश चलाख, उपसरपंच  ओमप्रकाश धमराव ढोलणे आणि ग्रामसेवक सचिव हेच अनुपस्थित राहत असल्याने ग्रामसभांचे महत्त्व कमी होत आहे. जबाबदार पदाधिकारी उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांच्या समस्या प्रलंबित राहत असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस भूमिका घेतली जात नसल्याचा आरोपही करण्यात आला.

“ग्रामसभा ही गावाच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. मात्र जबाबदार पदाधिकारीच गैरहजर राहत असतील, तर गावाचा विकास कसा होणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. तसेच ग्रामपंचायतीत पारदर्शकता नसून विविध योजनांतील निधीचा तपशील ग्रामस्थांसमोर मांडला जात नसल्याचाही आरोप करण्यात आला.

यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गावातील समस्या तातडीने सोडवाव्यात, ग्रामसभांना जबाबदार अधिकारी उपस्थित राहावेत आणि विकासनिधीचा हिशोब ग्रामस्थांसमोर मांडावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आंदोलनात दिलीप चलाख, विजय उंदीरवाडे, प्रशांत ढोलणे, ढीवरू भुरसे, अंकुश सोदुलवार, सौरभ पिपरे, संकेत ढोलणे, कैलास सहारे, गुरुदेव पिपरे, विश्वनाथ काटलाम, नामदेव पेंदोर, डोनू भंडारी, मंगेश शेडमाके, यशपाल कोहपरे, मानिक तुनकलवार यांच्यासह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.

Don`t copy text!