Home Breaking News गडचिरोली–उमरखेड भरधाव बस मुरखळा (नवेगाव) नजीक पलटली ; दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी...

गडचिरोली–उमरखेड भरधाव बस मुरखळा (नवेगाव) नजीक पलटली ; दोघांचा मृत्यू, अनेक प्रवासी जखमी

1188

आमदार डॉ. नरोटे यांची जिल्हा रुग्णालयात धाव

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २१ मे :  गडचिरोली येथून सकाळच्या सुमारास उमरखेडकडे निघालेली प्रवासी बस मुरखळा (नवेगाव) परिसरातील वळणावर भरधाव वेगात पलटी झाल्याने भीषण अपघात घडला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. एका वर्षाच्या चिमुकल्याची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित बसमध्ये सुमारे ५० प्रवासी प्रवास करत होते. मुरखळा (नवेगाव) परिसरात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला पलटल्याचे सांगितले जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढले आणि जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. नरोटे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. तसेच संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना जखमींवर तातडीने आणि सर्वतोपरी उपचार करण्याच्या सूचना दिल्या.

मात्र, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे या खूप उशीरा रुग्णालयात दाखल झाले. गंभीर अपघातातील जखमींवर उपचार सुरू असताना वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या उशीरा उपस्थितीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या भीषण अपघातामुळे जिल्हाभरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

Don`t copy text!