योगशक्तीचा जागर : तळोधी(मों) येथे विद्यार्थिनींच्या पुढाकाराने योगशिबिराचे आयोजन

207

योगशक्तीचा जागर : तळोधी(मों) येथे विद्यार्थिनींच्या पुढाकाराने योगशिबिराचे आयोजन
लोकवृत्त न्यूज
चामोर्शी, ता.:- तळोधी (मों) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून प्रेरणादायी योग शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयातील रावे (RAWE) उपक्रमांतर्गत सहभागी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना योगाचे महत्त्व पटवून देत प्रत्यक्ष योगासनांचे प्रात्यक्षिकही दिले.

भारतीय संस्कृतीतील अमूल्य ठेवा असलेल्या योगाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी असलेले महत्त्व विद्यार्थिनींनी प्रभावीपणे उलगडून दाखवले. अभ्यासाबरोबरच योगाचा नियमित सराव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मा. बनकर सर, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबिराचे आयोजन केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदित्य कदम, प्रलय झाडे, पवन बुधबावरे, छबिल दुधबळे, उषा गजभिये व कृषी विस्तार सहाय्यक प्राध्यापक निकिता येलमुले यांच्या मार्गदर्शनात झाले.
विद्यार्थिनी अनुष्का गाडेवार, कशिष चांदेकर, खुशी चंदेल, वैष्णवी चिलके व सायली बुराडे यांनी योगदिनाचे महत्त्व विशद करत उपस्थितांना मार्गदर्शन केले.