शिवाजीराव काकडे व हर्षदाताई काकडे यांच्या मागणीला शासनाकडून मिळाला सकारात्मक प्रतिसाद…!

0
155

 

लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी-आफताब शेख 21 मे :- जनशक्ती विकास आघाडी शेवगाव-पाथर्डीचे संस्थापक ॲड.डॉ.विद्याधर उर्फ शिवाजीराव काकडे व जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे यांनी उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांची भेट घेऊन शेवगाव तालुक्यात एम.आय.डी.सी सुरू करण्यात यावी अशी लेखी मागणी केलेली होती.जनशक्तीच्या या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.नुकतेच औद्योगिक विकास महामंडळाने एम.आय.डी.सी साठी लागणारी माहिती व कागदपत्रे ॲड.काकडे यांना मागितले आहेत. तशा आशयाचे पत्र क्षेत्र व्यवस्थापक यांच्या कार्यालयातून प्राप्त झाले असल्याची माहिती ॲड.काकडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. यावेळी ॲड.काकडे म्हणाले की, शेवगाव येथे एम.आय.डी.सी सुरू करावी ही मागणी आम्ही खूप वर्षापासून शासन दरबारी करत आहोत. आम्ही नुकतेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री ना.उदय सामंत यांना मुंबई येथे भेटलो व शेवगाव येथे एम.आय.डी.सी. साठी लागणारी भौगोलिक परिस्थितीची माहिती दिली. औद्योगिक क्षेत्र उभारणीसाठी लागणारे शाश्वत पाणी जायकवाडी धरणाचे बॅक वॉटर ०८ ते १० कि.मी. अंतरावर असल्याचे तसेच वीजपुरवठा, दळणवळणासाठीचे रस्ते व जिरायत माळरान जमीनीही उपलब्ध होऊ शकतात असे मंत्री सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले व त्यांनी वरील बाबी सकारात्मक घेऊन तसे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. एम.आय.डी.सी.साठी लागणारी माहिती व आवश्यक कागदपत्रे आम्ही अधिकाऱ्यांना पाठवले आहेत. त्यामुळे शेवगाव येथे एम.आय.डी.सी. होणार म्हणून आमच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शेवगाव शहरालगत एम.आय.डी.सी. झाली तर शेवगावच्या वैभवात भर पडून शहराचा विकास झपाट्याने होईल. तसेच बेरोजगार युवकांना तालुक्यातच रोजगार उपलब्ध होईल. गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळेल व तालुक्याच्या आर्थिक चक्रात बदल होऊन तालुक्यातील जनतेचा विकास होईल. शेवगाव-पाथर्डी मधील सर्व सामान्य शेतकरी, तरुणांच्या न्याय हक्कासाठी जनशक्ती विकास आघाडी नेहमीच अग्रेसर असते. एम.आय.डी.सी.साठी जनशक्ती विकास आघाडीने सातत्याने गेल्या दहा वर्षांपासून शासन दरबारी वेळोवेळी मागणी केलेली आहे व आताशीक त्या मागणीला कुठेतरी न्याय मिळाल्याचे दिसते आहे असेही ते बोलताना म्हणाले.
यावेळी जि.प.सदस्या सौ. हर्षदाताई काकडे, जगन्नाथ गावडे, अल्ताफभाई शेख, विनोद मोहिते, वैभव पूरनाळे, सचिन म्हस्के, भाऊसाहेब राजळे, भाऊसाहेब सातपुते, अकबरभाई शेख, आबासाहेब काकडे, लखन पातकळ, माणिक गर्जे, अमर पूरनाळे, नामदेव ढाकणे यांच्यासह जनशक्तीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here