पालघर पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई : दोन ट्रकमधून १.७८ कोटींचा अवैध तंबाखूजन्य माल जप्त

137

पालघर पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई : दोन ट्रकमधून १.७८ कोटींचा अवैध तंबाखूजन्य माल जप्त

लोकवृत्त न्यूज
पालघर, २५ जुलै :– महाराष्ट्रात बंदी असलेला तंबाखूजन्य गुटखा व पानमसाल्याची मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या टोळीवर पालघर पोलिसांनी अचूक कारवाई करत तब्बल १,७८,६५,२४८/- किंमतीचा मुद्देमाल ट्रकसह जप्त केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांना मिळालेल्या गुप्त माहितीनंतर करण्यात आली.
२५ जुलै रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून दोन कर्नाटक पासिंग ट्रक (क्र. KA-56-9490 आणि KA-39-A-3012) गुजरातहून मुंबईकडे गुटख्याची खेप घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक अजय गोरड (तलासरी) व पोनि. प्रदीप पाटील (स्थानिक गुन्हे शाखा) यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथके तयार करण्यात आली. मौजे तलासरी विकासपाडा येथे सापळा रचून ही ट्रक दुपारी १.१५ वाजता थांबवण्यात आली.
तपासणीदरम्यान भाताच्या तुस भरलेल्या गोण्यांखाली लपवलेला ₹१,२८,६५,२४८/- किंमतीचा सुगंधित गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ आढळून आला. ट्रकचालक इप्तेकार हबीब शेख (रा. कुर्ला, मुंबई) आणि अक्षय नंदकुमार सातपुते (रा. सांगली) यांना ताब्यात घेण्यात आले.
दोन्ही ट्रकसह एकूण ₹१.७८ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत विविध कलमांनुसार तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. प्रदीप पाटील, पोनि. अजय गोरड आणि पोउपनि दरगुडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. स्थानिक गुन्हे शाखा व तलासरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मिळून ही उल्लेखनीय कारवाई पार पाडली.
पालघर पोलिसांची ही धडक मोहीम गुटखा माफियांसाठी इशारा ठरली असून, जिल्ह्यातील बेकायदेशीर तंबाखू व्यवहारावर कडक कारवाई सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.